आळंदीत अवतरले हिमालयीन चैतन्य : ध्यानयोग शिबिरास उदंड प्रतिसाद

SHARE NOW

 

आळंदी, ११ एप्रिल २०२५ : वारकरी संप्रदायातील महान संत ज्ञानेश्वर यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या आळंदीच्या भूमीत प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या हिमालयीन समर्पण ध्यान योग शिबिराला भारतासह जगभरातून हजारो साधकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी देवाची, पुणे आणि श्री शिवकृपानंद स्वामी फाउंडेशन, गुजरात यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १० ते १२ एप्रिल २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. त्यातील पहिल्या दोन दिवसांमध्ये १५ ते २० हजार साधकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून आध्यात्मिक अनुभूती घेतली.

शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी दीपप्रज्वलन सोहळा आमदार अशोक पवार, डॉ. डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, ओडिशा पोलिस दलातील आयपीएस, महासंचालक अधिकारी श्री दीक्षित, श्री संदीप पाटील, आयपीएस, पोलीस महानिरीक्षक, अति नक्षलविरोधी अभियान, महाराष्ट्र राज्य, श्री शिवकृपानंद स्वामी फाउंडेशनचे संचालक अंबरीश मोडक, चंदेली महाराज, जोग महाराज शिक्षण संस्थेचे सचिव यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीच्या पवित्र सान्निध्यात हिमालयातील गूढ आणि दिव्य चैतन्याचे दर्शन देणारे हे शिबिर, उपस्थित भक्तांसाठी अध्यात्मिक शांती, आत्मानुभूती आणि अंतर्मुखतेचा एक अद्वितीय प्रवास ठरले. गेली दोन दिवस हे आध्यात्मिक शिबिर साधकांसाठी अत्यंत आगळीवेगळी पर्वणी ठरत आहे.

– स्वामीजींचे प्रवचन आणि आध्यात्मिक संदेश :

शिबिरात श्री शिवकृपानंद स्वामीजींनी आपल्या प्रभावी वाणीने श्रोत्यांच्या अंतःकरणात आध्यात्मिक प्रकाश जागवला. त्यांच्या प्रवचनातील काही मोलाचे संदेश:

Advertisement

“समाजातील विविध धर्म उपासना पद्धती आहेत, खरा धर्म मनुष्यधर्म आहे.”

“परमात्मा ही विश्वचेतना आहे, जी निर्मळ माध्यमातून प्रकट होते. भारतात जिवंत परमात्म्याची परिकल्पना गुरूंच्या रूपात मान्य केलेली आहे.”

“गुरु म्हणजे अंतर्मुखता देणारा दीपस्तंभ. जीवनात आध्यात्म्याचे बीज पेरले गेले तरच सकारात्मक परिवर्तन शक्य आहे.”

“ध्यान म्हणजे वर्तमानात राहणे, अपेक्षांविना जगणे. नियमित ध्यान साधनेने जीवनातील सर्व समस्या दूर होऊ शकतात.”

प्रवचनाच्या समाप्तीला स्वामीजींनी “मैं एक पवित्र आत्मा हूँ, मैं एक शुद्ध आत्मा हूँ” या मंत्राद्वारे सर्व साधकांकडून सामूहिक ध्यान करून घेतले.

– थेट प्रक्षेपण आणि जागतिक प्रसारण:

या दिव्य कार्यक्रमाचे “गुरुतत्त्व” यूट्यूब चॅनेलसह सुमारे ५० सॅटेलाइट व केबल टीव्ही चॅनेल्सवरून थेट प्रक्षेपण करण्यात आले असून भारतासह ७० पेक्षा अधिक देशांतील साधक याचा लाभ घेत आहेत.

आध्यात्मिक प्रदर्शनी विशेष आकर्षण:

या शिबिरात सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत सर्वांसाठी आध्यात्मिक प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले असून, आयोजकांच्या मते, ही प्रदर्शनी ध्यानसाधनेच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकते आणि प्रत्येक साधकासाठी प्रेरणादायी ठरते.

– संतभूमीत हिमालयाचे चैतन्य :

आळंदी सारख्या संतपरंपरेने पावन झालेल्या भूमीत हिमालयाच्या दिव्य ऊर्जेची अनुभूती देणारे हे शिबिर भक्तांच्या स्मरणात दीर्घकाळ रेखाटले जाईल, यात शंका नाही. हे शिबिर म्हणजे भक्तांसाठी एक आत्मिक पर्वणीच ठरली.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page