भंगार दुकानदारांवर कारवाईची मागणी
तळेगाव दाभाडे:
मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे. वडगाव. कामशेत. लोणावळा तसेच ग्रामीण भागातील भंगार खरेदी विक्री करणाऱ्या दुकानदारांमुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत असून पर्यावरणाची हानी होत आहे. त्यामुळे मावळ मधील भंगार गोळा करून त्याचा साठा करून ठेवणाऱ्या या भंगार व्यवसायिकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. मावळ मधील अनेक ठिकाणी भंगार गोळा करून खरेदी विक्री करणारे परप्रांतीय व्यावसायिक आहेत त्यांनी तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात भरवस्तीतील रिकाम्या जागा भाड्याने घेऊन तेथे भंगाराचा साठा केला आहे. शनिवार किंवा रविवारच्या दिवशी भंगार व्यवसायिक पहाटेच्या वेळी भंगारातील टायर. वायर. रबर व इतर वस्तू जाळून टाकतात. त्यामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट तयार होत असतात त्यामुळे दुर्गंधी पसरत आहे . तसेच काही भुरटे चोर चोरीचा माल आणि मद्यपी व्यक्ती घरातील चांगल्या वस्तू ही भंगारवाल्यांना विकत आहेत. त्यामुळे गुन्हेगारीही वाढत आहे. मागील काही महिन्यापूर्वी तळेगावातील एका परप्रांतीय भंगार व्यवसायिकाने तळेगाव एमआयडीसी मधील एका प्रसिद्ध कंपनीमधून नवीन लोखंडी जॉब चोरी करून काळ्या बाजारात विकल्याचे उघडकीस आले होते. तर काही भंगार व्यवसायिकांना जागामालक. राजकीय पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आणि पोलीस मुक सहमती देत आहेत असे देखील नागरिकांचे म्हणणे आहे. रहिवासी भागात दुपारच्या वेळी भंगार गोळा करणारे वाहन येत असते त्यावेळी त्या वाहनावर मोठ्या आवाजात स्पीकर लावलेले असतात त्यामुळे देखील लहान मुले व वृद्ध यांना त्रास होतो असे अनेक नागरिकांनी यासंदर्भात बोलताना सांगितले. कामशेत येथील कुसगाव मध्ये विनापरवानगी चालू असलेल्या भंगाराच्या दुकानामुळे डेंगू चा संसर्ग झाल्याचे उघड झाले आहे. स्थानिक प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता भंगार व्यवसायिक बिनधास्तपणे भंगार दुकान चालवताना दिसत आहे.






