अहमदाबाद मधे एअर इंडियाचे AI 171 विमान उड्डाणानंतर काही वेळातच कोसळले. विमानात २४२ प्रवासी आणि १२ क्र मेंबर्स होते
अहमदाबाद :
गुजरात मधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे AI 171 प्रवासी विमान कोसळण्याची धक्कादायक बातमी गुरुवार दिनांक १२जुन २०२५ रोजी समोर आली आहे. अपघात स्थळावरून आकाशात धुराचे प्रचंड लोट दिसत आहेत. दरम्यान या अपघातानंतर बचाव पथक तत्काळ घटनास्थळी पोहोचले आहे. अहमदाबाद विमानतळावरून विमानाने उड्डाण केल्यानंतर अवघ्या १० मिनिटातच हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. प्राप्त माहितीनुसार हे विमान अहमदाबाद हुन लंडनला जात होते आणि अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच मेघांनी नगर जवळ हा अपघात झाला. विमानतळापासून मेघानी नगरचे अंतर सुमारे १५ किलोमीटर आहे. अपघातानंतर लगेचच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोचल्या आणि आग विझवण्यास सुरुवात केली. प्राथमिक माहितीनुसार जेव्हा विमानाला अपघात झाला तेव्हा त्या विमानात २४२ प्रवासी व १२ क्र मेंबर्स असल्याची माहिती समोर आली आहे. या विमान अपघाताचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. घटनास्थळी BSF आणि एनडीआरएफ ची टीम रवाना करण्यात आली आहेत. अपघातग्रस्त विमान बोईगचे ७८७ ड्रीम लायनर असल्याची माहिती समोर येत असून हे विमान ११ वर्ष जुने होते असे देखील सांगितले जात आहे.