वडगाव मावळ मधे सामुदायिक विवाहाची नवी दिशा.स्व पै केशवराव ढोरे प्रतिष्ठान समितीच्या अध्यक्षपदी अनिल कोद्रे
वडगाव मावळ :
स्वर्गीय पैलवान केशवराव ढोरे प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात येणाऱ्या सामुदायिक विवाह सोहळा समितीची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी सामाजिक कार्यात सक्रीय असलेले अनिल कोद्रे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. कोद्रे यांच्या नेतृत्वाखाली यंदाचा सामुदायिक विवाह सोहळा अधिक व्यापक, सुटसुटीत आणि समाजोपयोगी स्वरूपात साजरा होणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या नूतन कार्यकारिणीत कार्याध्यक्षपदी खंडूजी काकडे, कार्यक्रम प्रमुखपदी संभाजी येळवंडे, खजिनदारपदी अक्षय बेल्हेकर, सहखजिनदारपदी गणेश झरेकर यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदाची जबाबदारी सुधीर ढोरे व कार्तिक यादव यांच्याकडे सोपविण्यात आली असून, प्रसिद्धीप्रमुखपदी केदार बवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ही घोषणा प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ ढोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी संचालक विलास दंडेल, गणेश विनोदे, अरुण वाघमारे, राजेंद्र वहीले, सुनील शिंदे, अर्जुन ढोरे, विवेक गुरव, सदाशिव गाडे, अजय धडवले, रोहीदास गराडे, शंकर ढोरे, बाळासाहेब तूमकर, संजय दंडेल, सतीश गाडे, विकास लालगुडे, सुहास विनोदे, अनिकेत भगत आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यंदाचा सामुदायिक विवाह सोहळा १४ एप्रिल २०२६ रोजी मोठ्या उत्साहात, पारंपरिक विधी आणि सांस्कृतिक वातावरणात आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबांवरील विवाह खर्चाचा ताण कमी करत, समाजातील समता, ऐक्य व सहकार्याची भावना वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविला जात असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.
नूतन पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, अधिकाधिक गरजू व वंचित कुटुंबांपर्यंत या सामुदायिक विवाह उपक्रमाची माहिती पोहोचविण्यावर भर देण्यात येणार आहे. पारदर्शक नियोजन, शिस्तबद्ध अंमलबजावणी आणि सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून विवाह सोहळा यशस्वी करण्याचा निर्धार समितीने केला आहे.
या सामुदायिक विवाह सोहळ्याबाबत बोलताना प्रतिष्ठानचे संचालक तथा ज्येष्ठ पत्रकार संजय दंडेल म्हणाले कि सामुदायिक विवाह ही केवळ एक सामाजिक योजना नसून ती समाजातील समतेचा आणि माणुसकीचा आरसा आहे. स्व. पै. केशवराव ढोरे यांच्या विचारांचा वारसा जपत हा उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने सुरू आहे. नूतन कार्यकारिणीच्या माध्यमातून हा उपक्रम अधिक प्रभावी व आदर्शवत ठरेल, असा आम्हाला विश्वास आहे.
यावेळी सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे उपस्थित मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात आले. आगामी सामुदायिक विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने, सामाजिक बांधिलकी जपत कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.






