तळेगाव दाभाडेत धन्वंतरी मेडिकल फाउंडेशनचा भव्य उद्घाटन सोहळा
तळेगाव दाभाडे |

धन्वंतरी मेडिकेअर क्लिनिक व नॉवेल पॅथॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने स्थापन करण्यात आलेल्या धन्वंतरी मेडिकल फाउंडेशनचा उद्घाटन समारंभ तळेगाव दाभाडे नगरीचे विद्यमान नगराध्यक्ष मा. श्री. संतोषजी दाभाडे यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडला.
ज्येष्ठ डॉक्टर डॉ. लक्ष्मणराव कार्ले यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या फाउंडेशनचा मुख्य उद्देश गोरगरीब व गरजू रुग्णांना माफक दरात दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे हा आहे. वैद्यकीय सेवेचा खरा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा, या प्रामाणिक हेतूने या संस्थेची सुरुवात करण्यात आली आहे.
यावेळी बोलताना नगराध्यक्ष संतोषजी दाभाडे म्हणाले,
“वैद्यकीय क्षेत्रात सेवा देणे हीच खरी सेवा आहे. सर्वसामान्य गरजू रुग्णांची सेवा घडावी आणि त्यांना दिलासा मिळावा, हाच या फाउंडेशनचा खरा हेतू आहे.”
उद्घाटन प्रसंगी डॉ. लक्ष्मणराव कार्ले यांनी आपल्या ४५ वर्षांच्या आरोग्य सेवेचा अनुभव सांगताना भावनिक शब्दांत नमूद केले की,
“आरोग्य सेवेत काम करत असताना परमेश्वरानेच आपली निवड केली असावी, अशी जाणीव ठेवून मी सदैव प्रामाणिक सेवा दिली. त्याचा रुग्णांना लाभ झाला, याचे समाधान आज मला लाभते.”
प्रमुख पाहुणे लायन डॉक्टर शाळीग्राम भंडारी यांनी या सेवाभावी उपक्रमाचे कौतुक करताना, कविता, शेरोशायरी व दृष्टांतांच्या माध्यमातून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
“आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांच्या खांद्यावर डॉक्टरांचा आधाराचा हात पडला, तर त्यांच्या जीवनात आनंद निश्चितच फुलतो,” असे ते म्हणाले.
या पवित्र व प्रसन्न समारंभास तालुक्यातील ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ॲड. निवृत्ती फलके (संस्थापक – वनश्री), भगवान वाघमारे (संस्थापक – भारतीय योग संस्थान), मा. रवी आचार्य, डॉ. आशा व विजय राव (घरोडा संस्थेचे संचालक), योगसाधक समिती तळेगाव दाभाडेचे पदाधिकारी, श्रीमती कुलकर्णी ताई, गणेश कार्ले, ज्येष्ठ लेखक-वक्ते डॉ. शाळीग्राम भंडारी, श्रीमती जयश्री गोपाळघरे यांच्यासह वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट व प्रभावी सूत्रसंचालन राजेंद्र सगर यांनी केले. अतिशय सुग्रास भोजनाने या भव्य उद्घाटन समारंभाची सांगता झाली.






