वडेश्वर-माऊ ग्रामपंचायत हद्दीत नवीन शासकीय दवाखान्यांना हिरवा कंदील – टाटा पॉवरकडून जमीन हस्तांतर पूर्ण!
अंदर मावळ :
वडेश्वर/माऊ ग्रामपंचायत हद्दीतील अंदर मावळच्या पश्चिम भागासाठी जिल्हा परिषद पुणे यांच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य उपकेंद्र (सरकारी दवाखाना), पशुवैद्यकीय दवाखाना (गुरांचे हॉस्पिटल) आणि तलाठी कार्यालय उभारणीसाठी 20 गुंठे (सुमारे 20,000 चौ. फूट) जमीन टाटा पॉवर कंपनीकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या जागेचे रजिस्ट्रेशन कागदपत्र टाटा पॉवर आणि जिल्हा परिषद पुणे यांच्या दरम्यान पूर्ण झाले असून जागेचे अधिकृत हस्तांतर ग्रामपंचायत वडेश्वर-माऊ मार्फत करण्यात आले.
या प्रसंगी मावळ लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत, टाटा पॉवरचे अधिकारी श्री. मनोहर म्हात्रे, राजेंद्र गावडे, गटविकास अधिकारी श्री. कुलदीप प्रधान, आरोग्य अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी आणि ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते.
या उपक्रमामुळे खांडी, सावळा, निळशी, कुसूर, बेंदेवाडी, डाहुली, कांबरे (अ.मा.), बोरीवली, वाहणगाव, कुसवली, नागाथली, वडेश्वर आणि माऊ या परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे, असे शिवसेना जिल्हा प्रमुख श्री. राजेश खांडभोर यांनी सांगितले.
गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान म्हणाले की,
“टाटा पॉवरने शासकीय इमारतीसाठी दिलेल्या या जागेवर आम्ही आरोग्य केंद्र आणि पशुवैद्यक दवाखाना उभारणार असून उर्वरित भागात महिला सक्षमीकरण आणि युवक रोजगार उपक्रम राबवण्याचे धोरण तयार करत आहोत. या कामात खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी विशेष पुढाकार घेतला.”
कार्यक्रमास सरपंच सौ. छायाताई रवींद्र हेमाडे, ग्रामसेवक श्री. सचिन कासार, उपसरपंच श्री. वासुदेव लष्करी, सदस्या सौ. मनीषाताई दरेकर, लिपिक श्री. वासुदेव तनपुरे आदी मान्यवर उपस्थित होते.
सरपंच सौ. छायाताई हेमाडे यांनी सांगितले की,
“या जागेवर लवकरच आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना आणि तलाठी कार्यालयाचे भूमिपूजन करून काम वेगाने पूर्ण करण्यात येईल.”






