उर्से खिंडीत २५ वर्षापासून अंधाराचे साम्राज्य
उर्से : पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्ग. चाकण तळेगाव महामार्गांना पुणे मुंबई द्रुतगती महामार्गाशी जोडणारा महत्त्वाचा आणि रदारीचा रस्ता म्हणून उर्से खिंड रस्ता ओळखला जातो. पुणे मुंबई द्रुतगती मार्ग अस्तित्वात आल्यानंतर पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्ग. चाकण तळेगाव महामार्गांना द्रुतगती महामार्गाशी जोडणारा सोयीचा रस्ता म्हणून उर्से खिंडीतील हा रस्ता विकसित करण्यात आला. परंतु गेल्या २५ वर्षापासून या उर्से खिंडीतील रस्त्यावर पथदिवे बसवले गेलेले नाही. या रस्त्यावरून रोज शेकडो लहान-मोठी वाहने उर्से औद्योगिक पट्ट्याकडे जातात तसेच शेकडो कामगारांच्या दुचाकी. बसेस या रस्त्यावरून दिवस-रात्र जात येत असतात. पुणे मुंबई महामार्ग ते द्रुतगती महामार्गावरील पुलापर्यंतचा जवळपास दीड किलोमीटरचा हा रस्ता रात्री अगदी सुमसान असतो. त्यामुळे रात्रपाळीवरून येणाऱ्या जाणाऱ्या कामगारांसह अन्य वाहन धारकांनाही वाट मारीचा धोका आहे. मागे याच अंधाराचा फायदा घेऊन एका कामगाराचा येथे खून करण्यात आला होता. तसेच वाटमारीचे गुन्हेदेखील या खिंडीत घडलेले आहे. तरी उर्से खिंडीत पथदिवे बसवण्याची मागणी उर्से. वडगाव. तळेगाव येथील नागरिकांसह येथून जाणाऱ्या येणाऱ्या कामगार व वाहनचालकांनी केली आहे. रस्ते विकास महामंडळाने सर्वांच्याच सुरक्षेसाठी आय आर बी मार्फत उर्से खिंड रस्त्यावर पथदिवे बसवणे गरजेचे आहे.