मावळ तालुक्यातील तिकोनापेठ येथे अल्पवयीन आदिवासी मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपीच्या विरोधात लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
लोणावळा : मावळ तालुक्यातील पवना धरणाच्या जवळील तिकोनापेठ येथे एका अल्पवयीन आदिवासी मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात रमेश रामदास वाघमारे( राहणार तिकोनापेठ तालुका मावळ जिल्हा पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये भारतीय न्याय संहिता कलम 65(1) आणि बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2021(पोक्सो कायदा) च्या कलम 4.8.12. अन्वये गुन्हा रजिस्टर नंबर 169/2025 दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेली फिर्यादीनुसार ५ मे १०मे च्या दरम्यान रात्री ९ वाजण्याच्या सुमारास आरोपीच्या राहत्या घरात ही घटना घडली. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असताना देखील आरोपी रमेश वाघमारे यांनी सदर मुलीला घरात बोलवून तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर लैंगिक अत्याचार केला असल्याचे फिर्यादीमध्ये नमूद केले आहे. या प्रकरणी पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया म्हेत्रे या करत आहेत. तिकोनापेठ येथे घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. अल्पवयीन आदिवासी मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला फाशीचीच शिक्षा व्हावी अशी मागणी सर्वत्र होत आहे.