श्रीराम जन्मोत्सव सोहळा भक्तीमय वातावरणात साजरा; सरसेनापती दाभाडे राजघराण्यातील प्रमुखांची उपस्थिती
तळेगाव दाभाडे :
रविवार दिनांक 6 एप्रिल रोजी तळेगाव दाभाडे येथील श्रीराम मंदिरात श्रीराम जन्माचा आनंदसोहळा उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. दुपारी मध्यान्हाच्या सुमारास पाळण्यात श्रीफळाला ठेवत महिलांनी पाळण्यातील गाणी म्हणत त्यांच्या आनंदाला वाट करुन दिली.
येथील श्रीराम नवमी जन्मोत्सव समितीने दाभाडे आळीतील श्रीराम मंदिरात जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी सरसेनापती खंडेराव दाभाडे राजघराण्याचे सदस्य माजी नगराध्यक्ष श्रीमंत अंजलीराजे दाभाडे, माजी उपनगराध्यक्ष श्रीमंत सत्येंद्रराजे दाभाडे(सरकार), सरसेनापती उमाबाई दाभाडे ब्रिगेडच्या प्रमुख याज्ञसेनीराजे दाभाडे, संध्याराजे दाभाडे, दिविजाराजे दाभाडे आणि देवश्रीराजे दाभाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत जन्मोत्सव सोहळा साजरा झाला. यावेळी हभप जगताप महाराज, भाजपाचे शहराध्यक्ष संतोष दाभाडे(पाटील), आण्णा दाभाडे, छबुराव भेगडे, माजी नगराध्यक्ष रवींद्र दाभाडे, नितीन दाभाडे, अशोक दाभाडे, महेश शेलार, रचना शेलार, श्रीराम नवमी जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष सूरज थोरात, पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.
दरम्यान, सकाळी 8 वाजता मंदिरात रचना शेलार आणि महेश शेलार यांच्या हस्ते अभिषेक आणि महापूजा करण्यात आली. प्रभू श्रीराम यांच्या जन्माची कहाणी हभप जगताप महाराज यांनी कीर्तनातून उलगडवून सांगितली. सत्य, सन्मार्ग, आज्ञाकारी आणि दिलेले वचन निभावल्यामुळे रामाचा श्रीराम आणि श्रीरामाचा प्रभू श्रीराम अशी पुरुषोत्तमाच्या श्रेष्ठत्वाची उदाहरणे कीर्तनातून ऐकताना श्रोते मंत्रमुग्ध झाले. दुपारी साडेबारा वाजता श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यास सुरुवात झाली. ग्रामीण महिलांनी त्यांच्या आठवणीतील पारंपरिक लोकगीतांमधून बालक रामाच्या जन्माचे भक्तीगीतांमधून स्वागत केले. फुलांनी सजविलेल्या पाळण्याला हलवताना त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही.
शंखनाद, घंटानाद आणि टाळ मृदंगांच्या आवाजाने मंदिर परिसरातील वातावरण भक्तीमय झाले. रामायण पाठ, पारायण, भजन-कीर्तन आणि प्रवचन यांचा समावेश होता. श्रीराम जन्मोत्सवाच्या निमित्ताने विशेष महाआरती करण्यात आली. या उत्सवासाठी मंदिर परिसर विद्युत रोषणाईने सजवण्यात आला होता. भाविकांच्या मोठ्या उपस्थितीमुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. प्रसाद वाटपानंतर, सायंकाळी सहावाजता श्रीराम पालखी ग्रामप्रदक्षणेसाठी निघाली. पालखीचे स्वागत रांगोळ्याच्या पायघड्यांनी आणि फुलांच्या वर्षावात घरघरांसमोर करण्यात आले. दर्शनासाठी महिलांचा उत्साह मोठा राहिला. यावेळी काढण्यात आलेल्या शोभायात्रेत दिंडी, बॅण्डपथक, भजनीमंडळ, ढोल-लेझिम पथके आणि मल्लखांबपटुंनी भाग घेतला. श्रीराम नवमी जन्मोत्सव समितीने कार्यक्रमांचे शिस्तबध्द आयोजन केल्याबद्दल माजी उपनगराध्यक्ष सत्येंद्रराजे दाभाडे(सरकार) यांनी सर्वांचे कौतूक केले.