*मावळ तालुक्यात कृषी प्रकल्प राबवण्यासाठी आमदार सुनील शेळके यांचा पुढाकार* *मंत्रालयात कृषी विभागाच्या आढावा बैठकीत मावळच्या प्रकल्पांसाठी विशेष मागणी*

SHARE NOW

मुंबई, २७ मे – बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाच्या आढावा बैठकीत मावळ तालुक्याच्या कृषी विकासावर लक्ष केंद्रित करत आमदार सुनील शेळके यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या या बैठकीत मावळ तालुक्यात शीतगृह, सेंद्रिय शेती, इंद्रायणी तांदूळ व गुलाब फुलांवर प्रक्रिया करणारी केंद्रे उभारण्यासाठी आवश्यक जागा स्थानिक शेतकऱ्यांना भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.

या प्रकल्पांतर्गत राज्यात १२५० कृषी प्रकल्प मंजूर असून त्यापैकी ५५० प्रकल्प यशस्वीरित्या सुरू आहेत. यामध्ये धान्य गोदाम, कांदा चाळ, शीतगृह, राईस मिल, ऑईल मिल, पशुखाद्य युनिट यांसारख्या उपक्रमांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ३० टक्के प्रकल्प महिला शेतकरी भगिनींसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी हे मोठे पाऊल ठरत आहे.

Advertisement

आमदार सुनील शेळके यांनी आपल्या मावळ तालुक्याला या योजनांचा अधिकाधिक लाभ मिळावा यासाठी बैठकित ठोस मागण्या मांडल्या. जिल्हास्तरीय स्वतंत्र आढावा बैठक घेऊन मावळ तालुक्याचे प्रश्न मार्गी लावावेत, अशी विनंती त्यांनी कृषिमंत्र्यांकडे केली. तसेच स्मार्ट प्रोजेक्टमध्ये जे प्रस्ताव मंजूर झाले आहेत त्यांना वेळेत निधी वितरित व्हावा यासाठी टाईम आऊट मिळावा, अशीही सूचना त्यांनी केली.

या प्रकल्पांमुळे मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळण्यास मदत होणार असून स्थानिक आर्थिक व्यवहारांनाही चालना मिळणार आहे. शेतकऱ्यांना साठवणूक, प्रक्रिया आणि विक्री यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यास त्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होईल, असा विश्वास आमदार शेळके यांनी व्यक्त केला.

या बैठकीस आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, प्रकल्प संचालक हेमंत वसेकर, राज्य वखार महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, कृषी व पणन विभागाचे प्रधान सचिव, कृषी विभागाचे संचालक, तसेच ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे, दीपक हुलावळे, बाळासाहेब भानुसघरे, बबनराव भोंगाडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आधुनिक आणि उपयुक्त कृषी प्रकल्प राबवण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असा ठाम शब्द आमदार शेळके यांनी या वेळी दिला.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page