तळेगाव पासून दोन प्रस्तावित रेल्वे मार्गाचे नियोजन
तळेगाव दाभाडे :
तळेगाव पासून सुरु होणाऱ्या रेल्वेच्या दोन प्रस्तावित मार्गामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. तळेगाव पासून सुरु होणाऱ्या पुणे अहिल्यानगर आणि मिरज मार्गाला जोडणारा असे दोन मार्ग असून त्या मार्गाचे भूसंपादन लवकरच केले जाणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. रेल्वे मंत्रालयाने प्रस्तावित केलेल्या पुणे ते अहिल्यानगर या रेल्वे मार्गावरील बैठकीनंतर अजित पवार पत्रकारांशी बोलत होते. पवार पुढे म्हणाले की पुणे परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी दोन नवीन रेल्वे मार्गाची आखणी करण्यात येत आहे. तसेच राज्य सरकारकडून पुण्यासाठी दोन रिंग रोड तयार करण्यात येत आहे. पुणे ते अहिल्यानगर या नवीन तळेगाव ते उरळी कांचन या ७५ किलोमीटरच्या मार्गासाठी उरळीकांचन येथे शंभर हेक्टरवर मेगा टर्मिनल उभारण्यात येत आहे. या संदर्भात रेल्वे विभागाने दिलेल्या आराखड्यानुसार लवकरच भूसंपादनाला सुरुवात होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. हा रेल्वे मार्ग पुढील चार वर्षात करण्यात येणार असून भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला दिला जाईल अशी ग्वाही अजित पवार यांनी यावेळी दिली. पुणे ते अहिल्यानगर रेल्वे मार्ग करताना तळेगाव पासून चाकण. आळंदी. वाघोली. शिक्रापूर. रांजणगाव.सुपे.चास. व अहिल्यानगर असा केला जाणार आहे यात एकूण आठ स्टेशन असतील. यामुळे चाकण. शिक्रापूर. रांजणगाव तसेच अहिल्यानगर या औद्योगिक पट्ट्यांना या नवीन रेल्वेचा फायदा होणार आहे. त्यासाठी तळेगाव ते उरुळी कांचन हा ७५ किलोमीटरचा मार्ग नव्याने करण्यात येणार आहे यासाठी तळेगाव येथे न्यू तळेगाव व उरळीकांचन येथे नवीन स्टेशन उभारले जाणार आहे.






