तळेगाव मध्ये करदात्यांच्या पैशातून उभारलेल्या इमारती उत्पन्न शून्य*

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

शहरातील आरक्षित भूखंडावर तळेगाव दाभाडे नगरपालिकेने करदात्यांच्या पैशातून जनतेच्या सुविधांसाठी उभारलेल्या काही महत्त्वाच्या इमारती आजही वापराविना पडून असल्याने पालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारलेल्या या इमारतींमधून पालिकेला आजपर्यंत कोणतेही उत्पन्न मिळालेले नाही, ही बाब तळेगावकर नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण करणारी ठरत आहे.

 

शहरातील मध्यवर्ती भागात असलेली सुभाष मार्केटची इमारत गेल्या दहा वर्षांपासून पूर्णतः बंद अवस्थेत आहे. व्यापारी संकुल म्हणून उभारण्यात आलेल्या या इमारतीचा आजपर्यंत कोणताही वापर न झाल्याने ती दुर्लक्षित झाली आहे. याचप्रमाणे, भुजबळ हाॅल सभागृह गेल्या वीस वर्षांपासून पडीक व ओसाड अवस्थेत असून सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी उपयोगात येण्याऐवजी ते जीर्ण अवस्थेत पडून आहे.

Advertisement

 

याशिवाय, डी-मार्ट शेजारी दोन वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेले आधुनिक शॉपिंग सेंटर देखील अद्याप सुरू झालेले नाही. शहराच्या वाढत्या व्यापारी गरजा लक्षात घेऊन उभारण्यात आलेल्या या इमारतीमुळे पालिकेला मोठ्या प्रमाणात महसूल मिळू शकला असता; मात्र नियोजनाअभावी या इमारती सध्या उत्पन्नशून्य ठरला आहे.

 

पालिकेच्या या दुर्लक्षामुळे करदात्यांच्या पैशाचा अपव्यय होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. “इमारती बांधून ठेवण्यापेक्षा त्या वापरात आणून पालिकेला नियमित उत्पन्न मिळवून देणे आवश्यक आहे,अशी भावना सामाजिक कार्यकर्ते दिलिप डोळस यांनी व्यक्त केली

 

या पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित नगराध्यक्ष संतोष दाभाडे यांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन ठोस व तातडीचे निर्णय घ्यावेत, तसेच या इमारती कार्यान्वित करून पालिकेचा महसूल वाढवावा, अशी अपेक्षा तळेगावकर नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page