*मनोहरनगर परिसरात पोलिसांची धडक कारवाई; अवैध दारूसाठ्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल*

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

शहरातील मनोहरनगर परिसरात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी प्रभावी कारवाई करत देशी व विदेशी दारूचा मोठा साठा जप्त केला. या प्रकरणी २३ वर्षीय युवकावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

 

मंगळवार, दि. २३ डिसेंबर रोजी सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सवेरा बियर शॉपीच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत, मनोहरनगर परिसरात ही धडक कारवाई करण्यात आली. परिसरात अवैधरित्या दारू साठवून विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ कारवाईचे पाऊल उचलले.

Advertisement

 

याप्रकरणी पोलीस शिपाई बाबाराजे रामराव मुंडे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अतुल दिलीप राठोड (वय २३ वर्षे, रा. मनोहरनगर, तळेगाव दाभाडे, मूळ रा. कोंदरी, ता. महागाव, जि. यवतमाळ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीकडे देशी व विदेशी दारूचा एकूण २३ हजार ८८० रुपये किमतीचा प्रोव्ही माल आढळून आला असून हा साठा अनधिकृतपणे व बेकायदेशीररीत्या विक्रीच्या उद्देशाने ठेवण्यात आला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

 

या प्रकरणी आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमातील कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सध्या आरोपी ला कायदेशीर नोटीस देण्यात आली असून कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. या कारवाईमुळे परिसरात अवैध दारूविक्री करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार साबळे करीत असून, अवैध दारूविक्रीच्या साखळीचा तपास करून आणखी संबंधित व्यक्तींचा शोध घेण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page