मावळ तालुक्यातील आंबी येथील स्मशानभूमीत जादूटोण्याचा प्रकार; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
आंबी:मावळ तालुक्यातील आंबी गावातील स्मशानभूमीत अज्ञात व्यक्तीने जादूटोणा केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्मशानभूमी परिसरात काळ्या बाहुल्या .लिंबू, काळे धागे, नारळ, भस्म, कापडाचे तुकडे .फोटो. टाचण्या आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सकाळच्या सुमारास स्मशानभूमीकडे गेलेल्या ग्रामस्थांच्या ही बाब लक्षात आली. त्यानंतर ही माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली.
या घटनेमुळे महिलांमध्ये व ज्येष्ठ नागरिकांमध्ये विशेषतः दहशत निर्माण झाली असून, या आघोरी कृत्यामुळे नागरिक स्मशानभूमीकडे जाणे टाळत आहे. गावातील शांततेला बाधा पोहोचवणारा हा प्रकार असून अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. ग्रामस्थांनी तत्काळ सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना याची माहिती दिली.
घटनास्थळी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. संशयास्पद साहित्य हटविण्यात आले असून स्वच्छता करण्यात आली. याबाबत अज्ञात व्यक्तीविरोधात कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. अशा अंधश्रद्धापूर्ण कृत्यांमुळे समाजात भीती पसरत असल्याने दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.






