तळेगावात लाडक्या बाप्पाचे ढोल ताशाच्या गजरात मंगलमय आगमन
तळेगाव दाभाडे:
भाद्रपद शुद्ध चतुर्थी लाडक्या बाप्पाचे घरोघरी आणि विविध सार्वजनिक गणेश मंडळामध्ये जल्लोषात आगमन झाले. तळेगाव शहरात ढोल ताशाच्या गजरात ठिकठिकाणी बाप्पाचे आगमन सुरू आहे. तळेगाव शहराचा प्रथम मानाचा गणपती श्री डोळसनाथ महाराज तालीम सार्वजनिक गणेश मंडळ. भेगडे तालीम सार्वजनिक गणेश मंडळ. श्री गणेश तरुण मंडळ. राजेंद्र चौक गणेश मंडळ आदी गणेश मंडळांची शहरात सायंकाळी मिरवणूक निघाली. गणरायाच्या भक्ती भावात भाविक न्हाऊन निघाले. तसेच श्री गणरायाची मंगलमय मूर्ती घरी आणताना लहान मुलांसह ज्येष्ठांपर्यंत सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. सकाळी बाजारपेठेत घरगुती गणपती आणताना व पूजे सह सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी दिसून येत होती. गणेश मंडळात व घरात श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यासाठी पारंपारिक वेशभूषेत भाविक मूर्ती घरी घेऊन जात होते. बाल मंडळामध्ये लाडक्या गणरायासाठी डेकोरेशन. फुलाची सजावट करण्यास मध्ये लहान मुले मग्न होती. सोशल मीडियावर लाडक्या बाप्पाच्या आगमनानिमित्त शुभेच्छा संदेश देण्यात येत आहे. तळेगाव दाभाडे पोलिसांनी शहरात चौख बंदोबस्त ठेवला आहे शहरातील सर्व चौकात व आगमन मार्गावर पोलीस वाहतुकीचे नियमन करताना दिसत आहे. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या.तसेच गणेशोत्सवाच्या निमित्ताने बोलताना भेगडे तालीम मंडळाचे आधारस्तंभ माजी राज्यमंत्री संजय बाळा भेगडे म्हणाले की आज आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन झाले आहे. बाप्पा हा बुद्धी. समृद्धी आणि विकासाचा देव आहे त्याच्या आशीर्वादाने आपण सर्वांनी मिळून आपल्या देशाच्या व शहराच्या आणि समाजाच्या विकासासाठी काम करूया.






