गणेशोत्सवात शिवाजी शेलार मेमोरियल फाउंडेशनतर्फे १०१ गरजूंना अन्नदान

SHARE NOW

तळेगाव दाभाडे:

गणेशोत्सव हा आनंद, भक्ती आणि ऐक्याचा सण आहे. या सणाच्या निमित्ताने समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासाठी शिवाजी शेलार मेमोरियल फाउंडेशनतर्फे अन्नदान उपक्रम राबवण्यात आला. तळेगाव दाभाडे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील १०१ गरजूंना पोळी-भाजी, मसाले भात, गोड पदार्थ आणि मोदक प्रसाद देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली गेली. या उपक्रमामुळे शेकडो चेहऱ्यांवर समाधान आणि आनंद दिसून आला.

या उपक्रमाचे नेतृत्व श्रीमती लिपिका अविनाश शेलार आणि श्रीमती मिनाक्षी शेलार यांनी केले. गेल्या दोन वर्षांपासून शिवाजी शेलार मेमोरियल फाउंडेशन शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि पर्यावरण संवर्धन क्षेत्रात समाजोपयोगी उपक्रम राबवत आहे.

Advertisement

याप्रसंगी श्रीमती लिपिका शेलार म्हणाल्या, “गणरायाची खरी सेवा म्हणजे समाजातील उपेक्षितांना आनंद देणे. याच उद्देशाने आम्ही हा अन्नदान उपक्रम राबवला. भविष्यातही असे विधायक उपक्रम सुरू ठेवण्याचा आमचा मानस आहे. तसेच, विश्वस्त अनिरुद्ध शेलार यांनी सांगितले की, “संस्थेच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. यंदाच्या गणेशोत्सवात शैक्षणिक मदत, आरोग्य तपासणी शिबिरे आणि वृक्षारोपण यांसारखे उपक्रमही राबवण्यात येणार आहेत.”

या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्या देशमुख, सुनिता निकम, पूनम जाधव, तन्वी शेवकर, लहू सोनवणे, संचित अरनाळे, संस्कार अरनाळे आणि अंशुल शेलार यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page