तळेगाव दाभाडे नगरपरिषदेमार्फत जागतिक चिमणी दिनानिमित्त एक घास पक्ष्यांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
तळेगाव दाभाडे :
दि. २०/०३/२०२५ रोजी तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीमध्ये माझी वसुंधरा अभियान ५.० यांच्या प्रभावी अमलबजावणी करिता मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव दाभाडे नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी यांच्या मार्फत एक घास पक्ष्यांसाठी उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
वृक्षतोड, सिमेंट काँक्रीटची जंगले, शेतीवरील औषध फवारणी, पाण्याचे प्रदूषण, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण अशा सर्व पर्यावरण हानी करणाऱ्या गोष्टींमुळे निसर्गातील पशू पक्ष्यांचे जीवन संकटात आले आहे. त्यात जागतिक तापमानवाढ अर्थात वाढत्या उन्हामुळे चिमणी सारख्या नाजूक पक्षाचे अस्तित्व कमी होत चालले आहे. म्हणूनच चिमणी संवधर्नासाठी हा उपक्रम राबवण्यात आला.
सर्वांना लहानपणी जेवू घालताना आई-वडील ‘एक घास चिऊचा, एक घास काऊचा’ करून जेवू घालतात. परंतू सध्या हे घास भरवणं जरी होत असलं तरीही चिऊ आणि काऊ मात्र आपल्या सभोवताली सहजरित्या दिसत नाही. त्यातही पूर्वी सहज दिसून येणारी चिऊताई आता अगदी दिसेनाशी झालीये. आपल्या जैवसाखळीतून चिमणी अगदी नामशेष होईल की काय, अशी भिती निर्माण झालीये. याच चिमणी साठी 20 मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरा केला जातो.
पर्यावरणाविषयी जनजागृती करणारे विवेक भगत यांनी माणूस हा बुद्धिमान प्राणी असून ” सर्विस टू मॅन सर्विस टू गॉड ” च्या ऐवजी” सर्विस टू इन्व्हरमेंट सर्व्हिस टू गॉड ” या स्लोगनाच्या माध्यमातून मोलाचे मार्गदर्शन केले. पर्यावरण पुरस्कार प्राप्त श्री. संदीप पानसरे यांनी जर मुलांना पर्यावरण समजले तर भविष्यात त्यांना वृक्षांचे, पशुपक्ष्यांचे आपल्या जीवनातील स्थान उमजून त्यांच्या संरक्षण व संवर्धनाविषयीचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. शहरीकरणामुळे चिमण्यांचे प्रमाण कमी होत आहे म्हणून वृक्ष, पशुपक्ष्यांचे संवर्धन करून त्यांच्या संरक्षणासाठी आपण प्रयत्नरत असलो पाहिजे. व आपल्या मनात पर्यावरणाविषयीची आस्था व आवड असली पाहिजे असा जीवनोपयोगी संदेश उपस्थितांना दिला. तसेच स्टेशन तलावातील बेटावर चिमण्यांना धान्य ठेवण्यात आले.
या वेळी, उपमुख्याधिकारी ममता राठोड, रोटरीयन श्री. संदीप पानसरे, विवेक भगत कर व प्रशासकीय अधिकारी मोनिका झरेकर, स्थापत्य अभियंता गौरी चव्हाण, आरोग्य निरीक्षक प्रमोद फुले, उद्यान समन्वयक रणजीत सूर्यवंशी, लिपिक प्रवीण माने, गौरव तापकीर, सौरभ पोटवडे, सनी ननावरे, प्रफुल गलीयत, व इतर आदी उपस्थित होते.