भोसरी जिजामाता विद्यालयात आगळा वेगळ्या उपक्रमास प्रारंभ पिंपरी चिंचवड शहरात ओळख हरिपाठ ज्ञानेश्वरीची उत्साही प्रतिसाद :- प्रकाश काळे
आळंदी :
भोसरी येथील जिजामाता प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात ओळख श्री हरिपाठ ज्ञानेश्वरीची या आगळ्या वेगळ्या उपक्रमातून शालेय मुलांमध्ये मूल्यशिक्षण, संस्कारक्षम शिक्षण रुजविण्यास उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला आहे. या उपक्रमातून मुले निश्चित सुशिक्षित, सुसंस्कृत घडतील. या उपक्रमात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व शाळांसह सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळांनी सहभागी व्हावे असे आवाहन श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे यांनी केले.
भोसरी येथील सेवागिरी शिक्षण संस्थेच्या जिजामाता प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात ओळख हरिपाठ ज्ञानेश्वरीची या उपक्रमाचे आयोजन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी आणि ओळख श्री ज्ञानेश्वरीची एक परिवार यांचे वतीने करण्यात आले होते. यावेळी उपक्रमाची माहिती व मार्गदर्शन करताना श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा आशाताई कुलकर्णी होत्या. या प्रसंगी व्यासपीठावर सेवागिरी शिक्षण संस्थेचे सचिव अमित कुलकर्णी, ओळख श्री ज्ञानेश्वरी परिवाराचे अर्जुन मेदनकर, मुख्याध्यापक तानाजी लोहोकरे, निलेश गायकवाड यांचेसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद, शालेय विद्यार्थी उपस्थित होते.
या विद्यालयात शालेय मुलांना हरिपाठ, श्री ज्ञानेश्वरीची ओळख व्हावी. वर्षभराचे नियोजनात अभ्यासक्रम तयार करून मुलांना संस्कारक्षम बनविण्यासाठी उपक्रम हाती घेण्यात आला आहे.. सुमारे ८२ शाळांत हा उपक्रम सुरु झाला असून राज्यासह देश, विदेशात देखील हा उपक्रम सुरु करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील सर्व शाळांत मुलांना संस्कारक्षम शिक्षणा समवेत अध्यात्मिक बैठक आणि संत साहित्यातून व्यक्तिमत्त्व विकास व्हावा. यासाठी सेवा कार्य हाती घेतले असून हे सेवा कार्य माऊली करून घेत असल्याचे प्रकाश काळे यांनी सांगितले. या उपक्रमात शहरातील शाळांनी सहभागी व्हावे असे आवाहन काळे यांनी केले आहे.
यावेळी संत साहित्य प्रशालेस सुपूर्द करण्यात आले. श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे ७५० व्या जन्मोत्सव वर्षा निमित्त शाळेस माऊलींची प्रतिमा भेट देण्यात आली. एकनाथ महाराज यांची नाथषष्टी निमित्त श्रींचे प्रतिमा पूजन, माऊलींचे ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीचे पूजन, श्री सरस्वती पूजन करण्यात आले.
या उपक्रमात प्रकाश काळे यांनी शालेय मुलांशी सुसंवाद साधत उपक्रमाची माहिती देत मार्गदर्शन केले. श्री हरिपाठ, श्री ज्ञानेश्वरीचे महत्त्व सांगत शालेय मुलांनी अभ्यास कसा करायचा, श्रवण कसे करायचे, मनाची एकाग्रता कशा प्रकारे लागेल यावर मार्गदर्शन केले. ज्ञानेश्वरीतील ओव्यांतून हे माऊलींनी सांगितले आहे. या ओळख श्री ज्ञानेश्वरीची अभ्याक्रमातून मुलांना अब्यासात उपयुक्त ठरणार असून मुलांचे व्यक्तिमत्व कसे सुधारेल यावर बहुमूल्य मार्गदर्शन केले. या प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा आशाताई कुलकर्णी, सचिव अमित कुलकर्णी, अर्जुन मेदनकर यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी आर्या लोहोकरे या विद्यार्थिनीने ज्ञानेश्वरांचा अभंग सुश्राव्य आवाजात सुमधुर गात उपस्थितांची दाद मिळवली. या प्रसंगी अनुभूती देत अचानक बोलविलेली शालेय विद्यार्थिनी ज्ञानेश्वरी साळुंखे हिने संवाद साधला. यावेळी मुलांनी जय हरी, रामकृष्ण हरी नामजयघोष करीत उपक्रमात चैतन्य भरले. यावेळी परिसर आगळ्या वेगळ्या ऊर्जेने भारावून गेला. सूत्रसंचालन रत्नमाला पळसकर यांनी केले. प्रास्ताविक सुभाष सांगळे यांनी केले. आभार विश्वास समुद्र यांनी केले. पसायदान गायनाने उपक्रमाची सांगता झाली.