जगद्गुरु तुकोबाराय अनुग्रह दिनानिमित्त भंडारा डोंगरावर भव्य हरिनाम सोहळ्याचे आयोजन. पायथ्यावरील शंभर एकर पटांगणात यंदा प्रथमच पारायण महोत्सव; २३ ते ३१ जानेवारी २०२६ दरम्यान सोहळा

SHARE NOW

इंदोरी :

गेल्या सात दशकांपासून श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर अखंड चालणारा हरिनाम गाथा पारायण सोहळा व कीर्तन महोत्सव यावर्षी भव्यतेचा नवा अध्याय लिहिणार आहे.

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या अनुग्रह दिनानिमित्त, माघ शुद्ध दशमी या पवित्र दिनी होणारा हा सोहळा प्रथमच भंडारा डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या शंभर एकर पटांगणात आयोजित करण्यात येणार आहे.

या सोहळ्याचे आयोजन श्रीक्षेत्र भंडारा डोंगर संस्थान व वारकरी रत्न माऊली महाराज कदम संतभूमी उपासना व पारायण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

 

 

 

 

अनेक संत महोत्सवांचा संगम

 

या सोहळ्यात अनेक संतपरंपरेच्या महोत्सवांचा संगम होणार आहे.

 

कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत ज्ञानेश्वर महाराजांचा सप्तशतकोत्तर सुवर्णमोहोत्सवी जन्मोत्सव,

 

भक्तशिरोमणी नामदेव महाराज व संत जनाबाईंच्या अमृतमोहोत्सवी संजीवनी समाधी सोहळ्याचे औचित्य,

 

तसेच संत तुकाराम महाराजांच्या त्रिशतकोत्तर अमृतमोहोत्सवी सदेह वैकुंठगमन सोहळ्याचे स्मरण करण्यात येणार आहे.

 

 

हा भव्य सप्ताह २३ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत पार पडणार असल्याची माहिती सोहळ्याचे प्रमुख वारकरी रत्न हभप छोटे माऊली महाराज कदम यांनी दिली.

 

 

 

 

दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर नियोजन बैठक

 

या सोहळ्याच्या यशस्वी नियोजनासाठी २२ ऑक्टोबर रोजी श्रीक्षेत्र भंडारा डोंगर येथे हभप छोटे माऊली महाराज कदम यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन बैठक झाली.

या बैठकीस श्री विठ्ठल-रुख्माई देवस्थान ट्रस्ट, पंढरपूरचे विश्वस्त हभप शिवाजीमहाराज मोरे, देहू देवस्थानचे माजी अध्यक्ष हभप पुरुषोत्तम महाराज मोरे, तसेच पुणे जिल्ह्यातील अनेक कीर्तनकार, मान्यवर आणि वारकरी बंधू उपस्थित होते.

Advertisement

 

 

 

 

“पर्यावरण रक्षण” आणि “व्यसनमुक्ती”ची संकल्पना

 

या भव्य सप्ताहादरम्यान केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक जागृतीचीही संकल्पना राबविण्यात येणार आहे.

राज्यभरातील सहा पारायण सप्ताहांमध्ये व्यसनमुक्ती, पर्यावरण रक्षण, वृक्ष लागवड या उपक्रमांचा समावेश असेल.

भंडारा डोंगर परिसरातच एक लाखाहून अधिक देशी झाडे .वड, पिंपळ, चिंच, लिंब यांची लागवड केली जाणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद यांनी दिली.

 

 

 

 

भाविकांसाठी दररोज महाप्रसाद

 

सोहळ्याच्या काळात दररोज पहाटे काकडा आरती, गाथा पारायण, कीर्तन, संतचरित्र कथा, आणि सायंकाळी थोर कीर्तनकारांच्या हरिनाम सप्ताहाचे आयोजन असेल.

दररोजच्या महाप्रसादासाठी ५० गावातील वारकरी बंधू-भगिनी एक लाख भाकरींचा प्रसाद अर्पण करणार आहेत.

 

 

 

 

विशेष सन्मान व देणगी योगदान

 

या निमित्ताने श्रीक्षेत्र आळंदीच्या वारकरी शिक्षण संस्थेचे शताब्दी वर्ष साजरे करणारे शांतीब्रह्म ह.भ.प. मारुतीबाबा कु-हेकर महाराज व श्रीक्षेत्र देवगड संस्थानचे ह.भ.प. भास्करगिरी महाराज यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे.

 

सोहळ्याच्या मंदिर बांधकामासाठी देणगी

 

धोंडीभाऊ भोंडवे (संत तुकाराम सहकारी साखर कारखाना) यांनी ₹५ लाख देणगी जाहीर केली,

 

तर बबूशा कडलक परिवार (नवलाख उंबरे) यांनी ₹१ लाख,

 

आणि दिलीप ढोरे (माजी उपसरपंच, इंदोरी) यांनी ₹१ लाख अशी उदार देणगी दिली.

 

 

 

 

 

वारकरी संप्रदायाची एकजूट

 

“संत ज्ञानोबा-तुकोबा व सकल संतांच्या कार्याचा प्रचार-प्रसार अविरत सुरू ठेवण्यासाठी आम्ही तन, मन, धन अर्पण करू,” अशी ग्वाही श्रीक्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद यांनी दिली.

नियोजन बैठकीचे सूत्रसंचालन संतसेवक मनोहर ढमाले यांनी केले.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page