येत्या 22 व 23 फेब्रुवारी रोजी स्वरश्री संगीत महोत्सवाचे आयोजन
पिंपरी, प्रतिनिधी :
काळेवाडी येथील स्वरश्री फाउंडेशनच्या वतीने येत्या 22 व 23 फेब्रुवारी रोजी स्वरश्री संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव औंध येथील पंडित भीमसेन जोशी कला मंदिर येथे सायंकाळी चार वाजता होणार आहे. यंदाचा स्वरश्री पुरस्कार ज्येष्ठ गायक शिवदास देगलूरकर यांना आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सतारवादक उ. उस्मान खाँ यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
या महोत्सवात 22 फेब्रुवारी रोजी नामदेव शिंदे यांचे शास्त्रीय गायन, अंजली शिंगडे – राव यांचे व्हायोलिन वादन, उस्ताद अर्षद अली यांचे शास्त्रीय गायन होणार आहे; तर 23 फेब्रुवारी रोजी आरती ठाकूर यांचे शास्त्रीय गायन, विवेक सोनार यांचे बासरी वादन, तर भीमसेन जोशी यांचे पुत्र पं. श्रीनिवास जोशी यांचे शास्त्रीय गायन होणार आहे.
महोत्सवात संवादिनी साथसंगत उदय कुलकर्णी, गंगाधर शिंदे, अमेय बिच्चू, तर तबल्यावर प्रशांत पांडव, पं. समीर सूर्यवंशी, किशोर कोरडे, गणेश तानवडे, निलेश रणदिवे, कार्तिक स्वामी साथसंगत करतील. पखवाजवर गंभीर महाराज, तर टाळ साथसंगत शिवाजी डाके, मकरंद बादरायणी करतील. कार्यक्रमाचे निवेदन नामदेव तळपे आणि आकाश थिटे करणार आहेत, अशी माहिती महोत्सवाचे संयोजक नामदेव शिंदे यांनी दिली.