स्मशानभूमीत वास्तव्यास असणाऱ्या श्रीधर शिंदे या विद्यार्थ्याचे शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल यश
तळेगाव दाभाडे: शहरातील थोर समाजसेवक नथूभाऊ बाबुराव भेगडे (पाटील) शाळा क्रमांक१ या नगर परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी श्रीधर विठ्ठल शिंदे. इयत्ता ८वी याने शिष्यवृत्ती परीक्षेत९९ टक्के गुण मिळवून उज्वल यश मिळवले आहे. श्रीधर शिंदे हा आपल्या आईबरोबर तळेगावातील बनेश्वर स्मशानभूमीत झोपडी मध्ये राहुन अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झगडत हे यश संपादन केले आहे. तो हुशार विद्यार्थी म्हणून ओळखला जातो. अभ्यासाबरोबरच चित्रकला त्याचप्रमाणे खो-खो. कबड्डी. गोळाफेक. सूर्यनमस्कार या खेळामध्ये ही प्रवीण आहे. त्यांने स्वतःची बुद्धिमत्ता वापरून घरच्या घरी पवनचक्की बनवली आहे. त्याच्या या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ वैशाली राजेंद्र मिरगे यांनी श्रीधर याला पुष्पगुच्छ देऊन त्याचा सत्कार केला व त्याला शुभेच्छा दिल्या. श्रीधर याच्या यशाबद्दल सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.





