सुप्रसिद्ध कॅलिग्राफर पद्मश्री अच्युत पालव यांचेकडून ‘श्री शिवशंभू तीर्थ’ शिल्पाचा लोगो समितीकडे सुपूर्द
तळेगाव दाभाडे:छत्रपती शिवशंभू स्मारक समितीच्या भव्य ‘श्री शिवशंभू तीर्थ’ या शिल्प प्रकल्पाचा लोगो सुप्रसिद्ध कॅलिग्राफर आणि पद्मश्री पुरस्कार विजेते अच्युत पालव यांनी अत्यंत देखण्या, आकर्षक आणि भावनाप्रधान शैलीत साकारला आहे. त्यांच्या कलात्मक हस्तकौशल्यातून तयार झालेला हा लोगो शुक्रवार दि १७ ऑक्टोंबर रोजी समितीच्या प्रतिनिधींना औपचारिकरित्या सुपूर्द करण्यात आला.
या कार्यक्रमास समितीचे अध्यक्ष संतोष वसंतराव भेगडे (पाटील), विनीत दत्तात्रय भेगडे, तसेच मयसभा स्टुडिओचे संचालक प्रसाद कुर्हे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमात वातावरणात सन्मान, अभिमान आणि संस्कृतीचा संगम दिसून आला.
अच्युत पालव यांनी तयार केलेल्या या लोगोत छत्रपती शिवशंभूंच्या शौर्य, तेज, पराक्रम आणि आध्यात्मिकतेचे प्रतीकात्मक दर्शन घडते. त्यांच्या कॅलिग्राफीच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीतून मराठी संस्कृतीचे वैभव आणि छत्रपतींच्या अदम्य पराक्रमाची झलक प्रकट होते. लोगोमधील रेषांची प्रवाहीता, अक्षररचनेची ताकद आणि रंगसंगतीतील प्रभावी समतोल या माध्यमातून छत्रपतींच्या व्यक्तिमत्त्वातील तेजस्वीता व सामर्थ्य सुंदरपणे अधोरेखित केली आहे.
समितीच्या वतीने अच्युत पालव यांचे मन:पूर्वक आभार मानण्यात आले. समिती चे अध्यक्ष संतोष भेगडे (पाटील)यांनी सांगितले की, “श्री शिवशंभू तीर्थ” या प्रकल्पाच्या वैभवात हा लोगो नवी उंची आणेल आणि जनमानसात छत्रपतींच्या आदर्शांचे पुनरूज्जीवन घडवेल.”
‘श्री शिवशंभू तीर्थ’ हा प्रकल्प तळेगाव दाभाडे येथे साकारला जात असून, तो महाराष्ट्रातील एक आदर्श सांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्मारक म्हणून ओळख निर्माण करणार आहे. या शिल्प प्रकल्पाचे उद्दिष्ट म्हणजे छत्रपती शिवशंभूंच्या विचारांचे, आदर्शांचे आणि शौर्यपरंपरेचे स्मरण कायम ठेवणे.
या भव्य स्मारकाचे उद्घाटन सोमवार, दि. २० ऑक्टोबर २०२५ रोजी होणार असून, अयोध्या येथील प्रभू राम मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराज यांच्या हस्ते श्री शिवशंभू तीर्थाचे लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमाला राज्यातील विविध मान्यवर, कलाकार, आणि इतिहासप्रेमी उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी छत्रपतींच्या जीवनगौरवावर आधारित विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रदर्शनांचे आयोजन करण्यात येणार आहे.
‘श्री शिवशंभू तीर्थ’ या प्रकल्पाचा लोगो आता अधिकृतरीत्या सादर झाल्यामुळे, स्मारकाच्या निर्मितीला एक नवे कलात्मक आणि सांस्कृतिक परिमाण प्राप्त झाले आहे. या लोगोच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाची आणि कलेच्या समृद्ध परंपरेची झलक प्रकट होत असून, तो पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास समितीने व्यक्त केला.






