**पुणे जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या बदलीस कॅटकडून स्थगिती**
पुणे :
पुणे जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या पंकज देशमुख यांच्या बदलीस कॅटने (सेंट्रल अँडमिनिस्ट्रेटीव्ह ट्रायब्युनल) स्थगिती दिली आहे. राज्याच्या गृहविभागाने राज्यातील वरिष्ठ अधिका-यांच्या कालच बदल्या केल्या होत्या. त्यात पंकज देशमुख यांची बृहन्मुंबईत उपायुक्तपदी बदली करण्यात आली होती. या बदलीविरुध्द पंकज देशमुख यांनी कॅटमध्ये दाद मागितली होती. या संदर्भात कॅटने निर्णय देताना ही बदली पुढील आदेश देईपर्यंत स्थगित ठेवण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. या संदर्भातील पुढील सुनावणी 19 ऑक्टोबर रोजी होणार आहे. राज्यातील पोलिस कायदयानुसार पंकज देशमुख यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक पदावर कार्यरत होऊन सात महिन्यांचाच कालावधी झाला असताना अचानकच कोणतेही कारण न देता बदली केल्याचे त्यांनी कॅटपुढे नमूद केल्यानंतर कॅटने या बदलीस स्थगिती दिली आहे.