*सहा.पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तीक यांचा संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत कारवायांचा धडाका सुरूच; दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये सव्वा लाखांच्या एम.डी पावडरसह सुमारे 18 लाखांचा मुद्देमाल जप्त; पाच जण जेरबंद*
लोणावळा :
लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. गेल्या काही दिवसांपासून लोणावळा विभागात अमली पदार्थांची चोरून विक्री होत असुन त्यामुळे परिसरातील तरुणाई नशेच्या आहारी जात असल्याची माहिती श्री कार्तिक यांना मिळाली होती. त्यासाठी श्री सत्यसाई कार्तिक यांनी संकल्प नशामुक्ती अभियान हाती घेऊन त्याअंतर्गत परिसरातील युवकांमध्ये जनजागृती करणे, तसेच अमली पदार्थांचे सेवन, साठवणुक व विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. संकल्प नशामुक्ती अभियानाचाच एक भाग म्हणून श्री सत्यसाई कार्तिक यांनी मावळ परिसरातील अमलीपदार्थ विकणाऱ्या गुन्हेगारांविरोधात गेल्या काही दिवसात कठोर कायदेशीर कारवाया करून अनेक आरोपींना जेरबंद करून त्यांचेकडून मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ हस्तगत केले आहेत.
दिनांक 29/07/2024 रोजी श्री सत्यसाई कार्तीक यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, मौजे पाथरगाव गावचे हद्दीत काही इसम हे चारचाकी वाहनातून एम.डी हा अमली पदार्थ विक्रीकरिता घेऊन येणार आहेत. त्यानुसार श्री सत्यसाई कार्तिक यांचे पथकाने परिसरात सापळा रचला होता.मिळालेल्या बातमीप्रमाणे दि.29/07/2024 रोजी रात्री 11.40 वाजताच्या सुमारास मौजे पाथरगाव जवळ, जुने मुंबई पुणे हायवे रोडवरील हॉटेल मावळ माची समोर एक संशयित वाहन थांबल्याने श्री कार्तिक व पथकाने सदर वाहन थांबवून गाडीतील इसमांकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने व त्यांच्यावर संशय बळावल्याने पोलीस पथकाने जागेवरच पंचांसमक्ष नमूद इसमांचे घेतलेल्या झडतीमध्ये नमूद इसमांचे ताब्यात एकूण 5.05 ग्रॅम एम.डी पावडर मिळून आल्याने सदरचा माल पंचांसमक्ष सीलबंद करून ताब्यात घेण्यात आला आहे. तसेच नमूद इसमांकडे केलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये सदरचा माल हा विक्रीकरीता घेऊन जात असल्याचे सांगितले आहे. सदरच्या कारवाई मध्ये इसम नामे 1)योगेश केशव गायकवाड, रा.कांब्रे, तालुका मावळ, जिल्हा पुणे , 2)नारायण सोपान दाभाडे, रा. व्हिजन सिटी, जांभूळ, तालुका मावळ जिल्हा पुणे यांना त्यांचे चारचाकी वाहनासह ताब्यात घेऊन कामशेत पो.स्टे येथे आणून सदरबाबत पो. शि अमोल ननवरे यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून कामशेत पो.स्टे. गु र.न. 157/2024 एन.डी.पी.एस ॲक्ट 1985 चे कलम 8(क), 21(ब) (क), तथा भारतीय न्याय संहिता कलम 3(5) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास कामशेत पो.स्टे चे पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील हे करत आहेत.
तसेच दिनांक 30/07/2024 रोजी श्री सत्यसाई कार्तिक यांचे पथकाने त्यांना मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार लोणावळा शहर पो.स्टे हद्दीतील मौजे नांगरगाव गावचे हद्दीत टाकलेल्या छाप्यात इसम नामे 1)शाहरुख असलम शेख, राहणार केवरे वसाहत लोणावळा, तालुका मावळ जिल्हा पुणे, 2)नितीन भरत कालेकर, राहणार केवरे वसाहत, तालुका मावळ, जिल्हा पुणे, 3) साजीद अकबर शेख, राहणार टेबल चाळ, लोणावळा, तालुका मावळ जिल्हा पुणे हे त्यांचे ताब्यातील केटीएम ड्यूक दुचाकीवरून एम.डी पावडर विक्रीकरिता घेऊन जात असताना मिळून आल्याने पंचांसमक्ष घेतलेल्या झडतीमध्ये त्यांचे ताब्यातून एकूण 7.1 ग्रॅम एम.डी पावडरसह सुमारे 1.25 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदरबाबत पो. शि सुभाष शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून लोणावळा शहर पोलीस स्टेशन येथे गु.र.न.323/2024 एन.डी.पी एस ॲक्ट 1985 चे विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास लोणावळा शहर पो.स्टे चे पोलीस उपनिरीक्षक रोहन पाटील करत आहेत.
संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत केलेल्या वरील दोन कारवायांमध्ये रु.1,22,210/- ( अक्षरी एक लाख बावीस हजार दोनशे दहा) रु.किमतीच्या एकूण 12.15 ग्रॅम एम.डी पावडर सह एकूण रु.18,25,000/- (अक्षरी – अठरा लाख पंचेवीस हजार) किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन पोलीस यंत्रणा सखोल तपास करत आहे.
सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा.पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक, सहा पोलीस निरीक्षक सचिन राऊळ, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पो.हवा नितेश (बंटी) कवडे, पो.हवा अंकुश नायकुडे, पो.ना दत्ता शिंदे, पो.कॉ गणेश येळवंडे, पो.कॉ सुभाष शिंदे, पो.कॉ अंकुश पवार, पो. कॉ अमोल ननवरे, पो.कॉ महेश थोरात, पो.कॉ गणेश ठाकुर , पो.कॉ प्रतीक काळे यांचे पथकाने केली आहे.