मावळची तरुणाई नशेच्या गर्तेत रोज पोलीस कारवाई, तरी नशेखोरीला आळा का नाही?

SHARE NOW

मावळ | गणेश नामदेव भेगडे

मावळ तालुक्यात सध्या नेमकं काय सुरू आहे? विकासाच्या गप्पा, शिक्षणाचे पोकळ दावे आणि सुरक्षिततेची खोटी आश्वासनं देणाऱ्यांच्या नाकाखाली मावळची तरुणाई थेट अमली पदार्थांच्या नरकात ढकलली जात आहे. गांजा, ब्राउन शुगर, एमडी, कोरेक्ससारखी घातक नशा आज गावोगावी, कॉलेज परिसरात, सार्वजनिक ठिकाणी अगदी निर्लज्जपणे विकली आणि वापरली जात आहे. दररोज पोलीस कारवाई होते, गुन्हे दाखल होतात पण तरीही नशेचा सुळसुळाट थांबत नाही, हे नेमकं कशाचं अपयश आहे?

 

आज मावळमधील महाविद्यालयीन तरुण मोठ्या प्रमाणावर नशेच्या आहारी गेले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यात केवळ गरिबांची पोरं नाहीत, तर श्रीमंत, प्रतिष्ठित आणि ‘संस्कारी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घरातील मुलंदेखील या नशेच्या दलदलीत रुतलेली आहेत. पैसा असो वा नसो, नशेने सगळ्यांनाच गाठलं आहे. शिक्षणासाठी घराबाहेर पडलेली पोरं आज नशेसाठी घर लुटायला मागेपुढे पाहत नाहीत हीच मावळची भयावह वस्तुस्थिती आहे.

 

पोलिस प्रशासन रोज कारवाई करत असल्याचे आकडे मांडते. मग प्रश्न साधा आणि सरळ आहे कारवाईनंतरही नशेचा बाजार तेजीत का? लहानसहान विक्रेते पकडले जातात, पण मोठे मासे नेहमी जाळ्याबाहेर कसे राहतात? नशेच्या या काळ्या धंद्याला कुणाचे वरदहस्त आहेत का? की सगळा खेळ केवळ कागदोपत्री कारवाईचा आणि प्रसिद्धीपुरताच आहे? मावळच्या जनतेला आता गुळमुळीत स्पष्टीकरण नको, तर ठोस आणि स्पष्ट उत्तर हवे आहे.

Advertisement

 

नशेचे दुष्परिणाम आता गावागावात उघडपणे दिसू लागले आहेत. घराघरातील शांतता हरपली आहे. पालक हतबल झाले आहेत. तरुण गुन्हेगारीच्या वाटेवर चालले आहेत. चोरी, मारामाऱ्या, अपघात, आत्महत्येचे प्रयत्न वाढत आहेत. नशेच्या भरात आयुष्य उद्ध्वस्त होत असताना, संबंधित यंत्रणा मात्र “आम्ही कारवाई करतोय” या एका ओळीत स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत.

 

सामाजिक संस्था, महाविद्यालये, ग्रामपंचायती आणि स्थानिक लोकप्रतिनिधी नेमकं काय करत आहेत? निवडणुकीपुरतीच का आठवते तरुणाई? व्यसनमुक्तीचे फलक लावून कर्तव्य संपलं असं समजायचं का? नशेचा पूर घराघरात शिरत असताना डोळेझाक करणं हीसुद्धा गुन्हेगारीच आहे, हे कुणी लक्षात घेणार आहे का?

 

मावळ तालुक्याच्या भविष्यासाठी हा केवळ एक लेख नाही, तर धोक्याचा इशारा आहे. आज जर नशेच्या रॅकेटवर कठोर कारवाई झाली नाही, पुरवठ्याची साखळी तोडली नाही आणि दोषींना पाठीशी घालणाऱ्यांवर हात टाकला नाही, तर उद्या मावळची तरुणाईच मावळेल आणि त्याची जबाबदारी कोण घेणार?


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page