‘बोल तुकोबारायांचे’ पुस्तक देऊन गुरुजनांचा सन्मान
इंदोरी
इंदोरी येथील प्रगती विद्या मंदिर व ह.भ.प. आ.ना. काशीद पाटील ज्युनिअर कॉलेज येथे माजी विद्यार्थी संघाच्या वतीने गुरुजन व गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान सोहळा उत्साहात पार पडला.
माजी विद्यार्थी संघाने आगळावेगळ्या पद्धतीने ‘बोल तुकोबारायांचे’ हे पुस्तक, पेन व गुलाब पुष्प देऊन शिक्षक व विद्यार्थ्यांचा गौरव केला. मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या शासनाच्या उपक्रमात मावळ तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल मुख्याध्यापक, शिक्षक व सेवक यांचा संघाचे अध्यक्ष दशरथ नाना ढोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तसेच समर्थ शलाका स्पर्धा परीक्षेत १००० विद्यार्थ्यांमधून अंतिम फेरीत प्रथम तीन क्रमांक पटकावणाऱ्या शुभम कामनवार, चिन्मय सांगळे व सोहम शिंदे या विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यांच्या यशामुळे प्रशालेचा नावलौकिक अधिक उंचावला आहे.
अध्यक्षीय भाषणात दशरथ नाना ढोरे यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक करत भविष्यातही शाळेच्या भौतिक सुविधा व गुणवंत विद्यार्थ्यांसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्ष्मण मखर यांनी केले. प्राचार्य व संघाचे सचिव महादेव ढाकणे यांनी शाळेचा लेखाजोखा मांडला. नियोजन मंगल काळे यांनी केले, सूत्रसंचालन रुपेश शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन शारदा वाघमारे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी विद्यार्थी संघाच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.






