गझलेने मराठी भाषा समृद्ध केली. – डॉ. अविनाश सांगोलकर
तळेगाव दाभाडे :

“मराठी भाषेचा प्रवास हा अत्यंत समृद्ध असून कवितेने भाषिक जाणिवा अधिक समृद्ध केल्या आहेत. असे असले तरी ‘गझल’ हा वांग्मय प्रकार मराठीत आल्याने अनेक शब्दांची सरमिसळ होऊन मराठी भाषा अधिक समृद्ध झाली आहे, असे मत गझल अभ्यासक आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. अविनाश सांगोलकर यांनी काढले. ते काल इंद्रायणी महाविद्यालय मराठी विभाग आणि बहि:शाल शिक्षण मंडळ व ज्येष्ठ नागरिक साहाय्यता कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, मराठी विभागप्रमुख डॉ. विजयकुमार खंदारे, डॉ. संदीप कांबळे, प्रा. सचिन चंदनशिवे, प्रा. ज्ञानेश्वर काकडे, प्रा. कृष्णा मिटकर, प्रा. क्षिप्रसाधन भरड आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख डॉ. विजयकुमार खंदारे यांनी केले. प्रास्तविकामध्ये त्यांनी मराठी भाषा आणि २०१३ साली महाराष्ट्र शासनाने मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यासंबंधी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करत मराठी विभागाच्या कार्याचा आढावा घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात कवितेचे महत्त्व विशद करत मराठी भाषेचा विस्तार, समृद्धता विशद करत प्रेरणा देणाऱ्या कविता सादर केल्या. त्यांनी सादर केलेल्या ‘जगण्याचा अजून करार बाकी आहे…’ या कवितेला विद्यार्थ्यांनी विशेष दाद दिली.
डॉ. सांगोलकर यांनी ‘चांगदेव पासष्टी’ ह्या ग्रंथाच्या निर्मितीप्रक्रियेचा आढावा घेत वयाच्या पासष्टीव्या वर्षी स्वतःच्या निवडक ६५ गझला एकत्र करून प्रकाशित केलेल्या ‘अविनाश पासष्टी’या ग्रंथाचा निर्मितीचा प्रवास उलगडून दाखवला. त्याचप्रमाणे मराठी गझल आणि अविनाश पासष्टीमधील गमतीदार गजरांचे त्यांनी सादरीकरण केले. गझलेचा इतिहास, गझलेचा प्रवास, मराठी, हिंदी, उर्दू गझलकार यांच्या कार्याचा आढावा घेतला. स्वतः लिहिलेल्या सामाजिक जाणीवेच्या नोंदी करत गमतीशीर गझला सादर केल्या. कार्यक्रमाला बीए, बीकॉम, बीएससी आणि एम ए चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी विशेष प्रयत्न घेतले. संस्थेचे अध्यक्ष श्री. रामदास काकडे, कार्यवाही श्री. चंद्रकांत शेटे यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
अनुष्का गरुड या विद्यार्थिनीने सूत्रसंचालन आणि आभार व्यक्त केले.






