*पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय देशात सर्वात आधुनिक*
पिंपरी चिंचवड :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड, पुणे येथे पोलीस आयुक्त कार्यालय, पिंपरी-चिंचवड या नूतन वास्तूचे भूमिपूजन, पोलीस आयुक्त कार्यालय पुणे ग्रामीण, पोलीस विश्रामगृह या नूतन वास्तूचे भूमिपूजन तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विकास कामांचे व उपक्रमांचे उदघाटन, भूमिपूजन आणि लोकार्पण पार पडले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, २०१८ मध्ये पुणे पोलीस आयुक्तालयाचे विभाजन करून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय तयार करण्यात आले. पुणे महानगर आणि जिल्ह्यात वाढत असलेली नागरी वस्ती व संपूर्ण पीएमआरडीए क्षेत्रात वाढत असलेले औद्योगिक क्षेत्र तसेच या संपूर्ण भागात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी या आयुक्तालयाची निर्मिती करण्यात आली. याच २०२५ वर्षात हे आयुक्तालय आपल्या स्वतःच्या इमारतीत जाणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.
याप्रसंगी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विकासकामांचे व उपक्रमांचे उदघाटनही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते पार पाडले. यामध्ये अग्निशमन संकुल तसेच डेटा हब या महानगरपालिकेच्या कामांचे कौतुक मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले. या भागात उद्योजकांना त्रास देणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
तसेच पुणे महानगर क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाकरिता महत्वपूर्ण असलेल्या पुरंदर विमानतळाच्या प्रकल्पाबाबत आवश्यक ते सर्व निर्णय वेगाने घेत हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्यमंत्री योगेश कदम, आ. महेश लांडगे, आ. विजय शिवतारे, आ. अण्णा बनसोडे, आ. सुनील शेळके, आ. शंकर जगताप, आ. शरद सोनवणे, आ. अमित गोरखे, आ. बापूसाहेब पठारे, पिंपरी-चिंचवड पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.