पाचाणे येथे ९ वर्षीय मुलाचा खाणीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू
पाचाणे : मावळ तालुक्यातील पाचाणे या गावात आंब्याच्या झाडाची राखण करण्यासाठी आलेल्या कुटुंबातील ९ वर्षीय मुलगा पाचाणे येथील खाणीत साठलेल्या पाण्यात बुडून मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे. मृत मुलाचे नाव सुरज सुनील भोसले(वय.९ वर्ष राहणार राजीव गांधी नगर देहूरोड) असे आहे. वन्यजीव मावळ रक्षक संस्थेचे संस्थापक निलेश संपतराव गराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार देहूरोड येथील भोसले कुटुंब काही दिवसांपूर्वी पाचाणे गावात आंब्याच्या झाडाची राखण करण्यासाठी आले होते. सुरज हा खेळता खेळता परिसरातील जुन्या खाणी कडे गेला असता त्याला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो खोल पाण्यात पडला सुरुवातीला शोध घेतला असता तो सापडला नाही. या घटनेची माहिती मिळताच मावळ वन्यजीव रक्षक संस्थेच्या रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेतली रात्रभर चाललेल्या शोध मोहिमेनंतर उशिरा सुरज याचा मृतदेह खाणी तुन बाहेर काढण्यात आला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी परंदवडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.