पंकज बाळासाहेब पिंपरे हा वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी झाला सी ए
टाकवे खुर्द :
नुकताच CA परीक्षांचा निकाल जाहीर झाला आणि मावळ तालुक्यातील कार्ला शेजारी असणाऱ्या टाकवे खुर्द या खेड्यातील कु. पंकज बाळासाहेब पिंपरे याने त्याचे CA अवघ्या वयाच्या 22 व्या वर्षी पूर्ण केले.
पंकजची आर्थिक परिस्थिती ही सुरुवातीला खूप हलाखीची होती. वडील व्यवसायाने रिक्षा चालक असल्या कारणे त्याने त्याचे शिक्षण हे मराठी माध्यम शाळा आणि कॉलेज मध्ये केले.
रिक्षा व्यवसाय असल्या कारणे कोविड मध्ये लॉकडाउन मुळे पंकजच्या कुटुंबावर आर्थिक महासंकट ओढवले होते. लॉकडाउन मध्ये बारावीचा निकाल लागल्यानंतर त्याने CA च्या शिक्षणावर लक्ष केंद्रित केले. CA Foundation परीक्षेच्या नोंदणी साठी पैसे नसल्या कारणे व घरच्या दैनंदिन खर्चासाठी त्याच्या भावाची सोन्याची चैन गहाण ठेवावी लागली होती.
कोविड मुळे पुढे ढकलल्या गेलेल्या अर्ज दिनांकामुळे पंकजला CA Foundation डिसेंबर 2020 परीक्षेला नोंदणी करण्याची संधी मिळाली. ह्या संधीचे सोने करत त्याने विना क्लासेस 2-3 महिन्यांत CA Foundation ची परीक्षा पास केली. पुढे वैयक्तिक संघर्षाशी सामना करत CA Inter चे दोन्ही ग्रूप्स पहिल्या प्रयत्नात पास करून समाजामध्ये एक स्थान निर्माण केले.
पुढे CA Articleship साठी त्याची PWC या नामवंत बिग 4 फर्म मध्ये त्याची निवड झाली. तेथे दीड वर्षे पूर्ण झाल्यानंतर पुढे त्याचे Banking & Finance मध्ये स्पेशलायझेशन करण्यासाठी त्याने HSBC या नामवंत इंटरनॅशनल बँक मध्ये दीड वर्षे पूर्ण केली.
नोव्हेंबर 2024 हा त्याचा CA Final चा पहिला प्रयत्न होता.
परीक्षेआधी आजीची बिकट तब्येत आणि 7 दिवस आधी झालेल्या त्याच्या आजीच्या निधनानंतर पंकज भारावून व डगमगून गेला. दुर्दैवी त्याला त्याच्या आयुष्यातील प्रथम अपयश झेलावे लागले.
पुढचा प्रवास काट्यांचा आहे हे जाणून पंकज न डगमगता, पुरंदरचा तह हे शिवकालीन उदाहरण त्याने डोळ्यांत ठेवून व मॅनेजरच्या सहकार्यामुळे त्याने CA Finals चा अभयास अवघ्या दीड- दोन महिन्यांत पूर्ण करून चांगले गुणांनिशी CA ची पदवी प्राप्त केली.
त्याची आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या असलेली हलाखीची परिस्थिती, त्याची पदवीसाठी असलेली भूक आणि संघर्ष हा कौतुकास्पद असून त्याने विद्यार्थ्यांमध्ये नवी उमेद निर्माण केली आहे.
त्याच्या या प्रवासात त्याचे पालक, मित्र व त्याचे गुरू CA गुरुदेव गरुड & CA स्नेहल गरुड यांचा मोलाचा वाटा असल्याचे तो सांगतो. तसेच गरजू विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची तो इच्छा बाळगतो.