आषाढी महाएकादशीनिमित्त तळेगाव शहरातील विठ्ठल मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

आषाढी महा एकादशीनिमित्त तळेगाव शहरातील विठ्ठल मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पावसाचे वातावरण असूनही हजारो भाविकांनी मोठ्या श्रद्धेने पांडुरंगाचे दर्शन घेतले.

शाळा चौक येथील श्री विठ्ठल मंदिर संस्थांच्या वतीने पांडुरंगाच्या महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे मंदिरात सेवेकरी सीमा शेळके, चारुशीला पुलावळे, पांडुरंग गदादे यांच्या हस्ते पारंपरिक पूजा पार पडली. त्यानंतर महापूजा तळेगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक व वैष्णवी सरनाईक यांच्या हस्ते संपन्न झाली.यावेळी विठ्ठल मंदिर संस्थांचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री संजय बाळा भेगडे, सारिका भेगडे, संतोष भेगडे, हिंदुराज भेगडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

महा एकादशीनिमित्त संपूर्ण मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांच्या सजावटीने सजवण्यात आला होता. भाविकांसाठी विशेष दर्शनबारीचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर रांगा लागल्या होत्या. पावसातही भाविकांनी मोठ्या उत्साहाने दर्शन घेतले.

Advertisement

काकड आरती, भजन, हरिपाठ तसेच ह. भ. प. श्रीपाद अभ्यंकर यांच्या कीर्तनाने परिसर भक्तिमय झाला. रात्री जागराचे आयोजन करण्यात आले.

दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी मैत्री यश संस्था आणि श्री विठ्ठल मंदिर संस्थांच्या वतीने प्रसाद वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंदिर ट्रस्टचे ह. भ. प. बाळकृष्ण आरडे, यतीन शहा, प्रशांत दाभाडे, शामराव भेगडे, विलास गायकवाड, नारायण धामणकर, अरविंद हांडे पाटील, प्रकाश वालझाडे, सोनबा गोपाळे गुरुजी यांनी परिश्रम घेतले. संपूर्ण धार्मिक नियोजन पुरोहित अतुल देशपांडे व सीमा शेळके यांनी केले.

* दिंडी आणि प्रसाद वाटपाची अखंड परंपरा…

गेल्या ५४ वर्षांची परंपरा असलेली रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतनची दिंडी यंदाही विठ्ठल मंदिरात दाखल झाली. सुमारे ६०० विद्यार्थ्यांनी टाळ-मृदंगाच्या गजरात अभंग सादर केले. यावेळी मुख्याध्यापक दीपक फोंडके, विश्वस्त नंदन रेगे, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

तसेच लायन्स क्लब तळेगाव दाभाडे यांच्या वतीने गेल्या ३५ वर्षांपासून सलग दिंडीमध्ये सहभागी भाविकांसाठी प्रसाद वाटपाची परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page