सेंट्रल चौक ते वडगाव फाटा परिसरात दिवसाढवळ्या वेश्याव्यवसाय; पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
तळेगाव दाभाडे :
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील सेंट्रल चौक, घोरावाडी डोंगरपायथा, सोमाटणे फाटा खिंड, लिंबफाटा, सीआरपीएफ कॅम्प आणि वडगाव फाटा परिसरात दिवसाढवळ्या वेश्याव्यवसायाला ऊत आला आहे. गेल्या दोन ते चार वर्षांपासून या मार्गावर खुलेआम वेश्या व्यवसाय सुरू असून, यामुळे परिसरातील महिला आणि नागरिकांची मोठी कुचंबना होत आहे.
सोमाटणे फाटा खिंड, सीआरपीएफ कॅम्प, वडगाव फाटा या भागात दररोज आठ ते दहा महिला रस्त्याच्या कडेला उभ्या असतात. विशेष म्हणजे तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या अगदी काही मीटर अंतरावरही वेश्या उभ्या असताना पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याची नागरिकांतून तीव्र नाराजी आहे.
मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर व महामार्गालगत असलेल्या लॉजमध्ये ग्राहकांना घेऊन जाताना या महिला सर्रास दिसतात. या प्रकारामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या महिलांना त्रास सहन करावा लागत आहे. याचा परिणाम चांगल्या महिलांवरही होतो आहे. काही ठिकाणी बसथांबे आहेत, तिथे महिला वाहनाची वाट पाहत उभ्या असतात, परंतु त्यांच्याकडेही संशयाच्या नजरेने पाहिले जाते. ये-जा करणाऱ्या लोकांत एक प्रकारचा गैरसमज पसरत आहे, यामुळे सर्वसामान्य महिलांनाही मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
त्यामुळे पोलिसांनी या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कारवाई करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.