बंजारा समाजाची अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समावेश करण्याची मागणी तीव्र
तळेगाव दाभाडे:
महाराष्ट्रातील बंजारा समाजाने अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समावेश करण्याची मागणी पुन्हा एकदा तीव्र केली आहे. मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गात आरक्षण मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर बंजारा समाजालाही याच गॅझेटचा आधार घेत बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समावेश करण्याची मागणी बंजारा सेवा संघ मावळचे संस्थापक अध्यक्ष हिरा जाधव यांनी केली आहे.
मराठा समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर हिरा जाधव यांनी एक निवेदन प्रसिद्धीस दिले आहे.
हिरा जाधव यांनी निवेदनात म्हटले आहे, की १९५० साली संविधान लागू झाले. त्या दिवशी आंध्रप्रदेश, कर्नाटक, राजस्थान आणि तेलंगणातील बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) दर्जा मिळाला. पण १९६० साली महाराष्ट्राची निर्मिती झाली, तेव्हा महाराष्ट्र सरकारने बंजारा समाजाचा समावेश व्हीजेएनटी प्रवर्गात केला. ज्याला 3 टक्के आरक्षण आहे. जर ‘हैद्राबाद गॅझेटीयर’च्या आधारावर मराठा समाजाला ‘कुणबी प्रमाणपत्र’ मिळत असेल, तर त्याच गॅझेटीयरमध्ये ‘आदिवासी’ उल्लेख असलेल्या बंजारा समाजावर अन्याय का? हा केवळ अन्याय नाही, तर आपल्या संपूर्ण पिढ्यांच्या भविष्यावर घातलेला गदा आहे.
मुळात संपूर्ण भारतात बंजारा समाजाची समान बोली, एक भाषा, एक पेहराव, आराध्य दैवतही एक तरीही बंजारा समाज वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या प्रवर्गात का मोडतो ? हा बंजारा समाजावर अन्याय आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य सरकारने सर्व बंजारा समाजाचा सरसकट अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समावेश करण्यात यावा. अन्यथा बंजारा समाजाच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही जाधव यांनी दिला आहे.






