निवासी डॉक्टरांची सुधारित विद्यावेतनाची मागणी
तळेगाव स्टेशन:
शासकीय नियमानुसार सुधारित विद्यावेतन द्यावे, अशी मागणी निवासी डॉक्टरांना केली आहे. डॉ भाऊसाहेब सरदेसाई ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी याबाबत प्रशासनाकडे निवेदन दिले आहे. मात्र त्यावर अजूनही निर्णय होत नाही. सुधारित विद्यावेतन न दिल्यास येथील 110 डॉक्टर मंगळवार (दि.२४) पासून काम बंद आंदोलन करणार आहेत.
नॅशनल मेडिकल कमिशन आणि राज्य शासनाने वेळोवेळी निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतानामध्ये वाढ केली आहे, परंतु मागील वर्षापासून कॉलेज प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून देखील त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दैनंदिन आर्थिक गरजा पूर्ण होण्यासाठी या निर्णयांची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. अत्यावश्यक सेवा वगळता काम बंद आंदोलनाचा इशारा देऊनसुद्धा प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे रुग्णसेवा देत असताना काळी फीत लावून ते काम करत आहेत, दरम्यान, रविवारी झालेल्या मीटिंगमध्ये मंगळवार पासून अत्यावश्यक सेवा सुरू ठेऊन इतर काम बंद ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते झाल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या आंदोलनास केंद्रीय महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स यांनी पाठींबा दिला आहे.