एमआयटी ज्युनिअर कॉलेज, आळंदीचा बारावी परीक्षेत देदीप्यमान यश
आळंदी (प्रतिनिधी ) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे फेब्रुवारी-मार्चमध्ये आयोजित करण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत आळंदी येथील एमआयटी ज्युनिअर कॉलेजने आपले यशाचे सातत्य राखत उज्ज्वल यश संपादन केले आहे. यंदा महाविद्यालयाचा एकूण निकाल ९९.१३% लागला असून, परीक्षेस प्रविष्ट झालेल्या ३४७ विद्यार्थ्यांपैकी ३४४ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. शाखानिहाय निकालामध्ये वाणिज्य शाखेचा निकाल ९९.१९% लागला आहे. एकूण १२४ विद्यार्थ्यांपैकी १२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर विज्ञान शाखेचा निकाल ९९.१०% लागला असून, २२३ पैकी २२१ विद्यार्थ्यांनी यशाचे शिखर गाठले आहे. गुणवत्ता यादीमध्ये वाणिज्य शाखेतून सुप्रिया अनिल जडगे हिने ९५.५% गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. विज्ञान शाखेतून सौम्या बसवराज माशाळ हिने ८९% गुणांसह प्रथम क्रमांक संपादित केला.
या अभूतपूर्व यशाबद्दल MIT संस्थेच्या च्या कार्यकारी संचालिका प्रा. स्वाती कराड-चाटे आणि प्रोजेक्ट डायरेक्टर डॉ. ज्योती जोतवानी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले. तसेच यशाबद्दल मत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. सदाशिव कुंभार आणि उपप्राचार्य डॉ. ओंकार इनामदार म्हणाले की, हे यश म्हणजे प्राध्यापकांचे उत्कृष्ट मार्गदर्शन, त्यांनी घेतलेले अथक परिश्रम आणि विद्यार्थ्यांनी सातत्याने केलेल्या कठोर मेहनतीचे फलित आहे.
महाविद्यालय प्रशासनाने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.






