मावळातील ऐश्वर्या कार्ले सीए परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण पहिल्याच प्रयत्नात गवसले यश; ऐश्वर्याचे सर्वत्र कौतुक
तळेगाव दाभाडे :
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियातर्फे (ICAI) गेल्या सप्टेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या सनदी लेखापाल (CA) परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. या परीक्षेत मावळ तालुक्यातील ऐश्वर्या नवनाथ कार्ले हिने पहिल्याच प्रयत्नात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
मावळ तालुक्यातील विद्यार्थ्यांमध्ये हे यश संपादन करणारी ऐश्वर्या ही एकमेव विद्यार्थिनी ठरली आहे. तिने आपले प्राथमिक शिक्षण सेंट माऊंट ऍन स्कूल आणि उच्च शिक्षण गरवारे महाविद्यालय, पुणे येथे पूर्ण केले.
अभ्यासात सातत्य, आईचे मार्गदर्शन आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश मिळाल्याचे ऐश्वर्या हिने सांगितले. “ध्येय निश्चित केल्यावर प्रयत्नांची पराकाष्ठा केली, त्याचेच हे फळ आहे,” असे ती म्हणाली.
ऐश्वर्याच्या या यशाबद्दल अर्थशास्त्राचे प्रा. सुभाष जगताप, कृषिरत्न डॉ. बुधाजीराव मुळीक, तसेच श्री विठ्ठल-रुक्मिणी तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष साहेबराव काशीद-पाटील यांनी तिचे अभिनंदन केले.
“ऐश्वर्याने दहावी, बारावी आणि बी.कॉम. परीक्षांप्रमाणेच सीए परीक्षेतही प्रथम श्रेणी मिळवून आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीची परंपरा कायम ठेवली आहे,” असे तिचे वडील नवनाथ कार्ले यांनी सांगितले.






