धुळीच्या विळख्यात टाकवे परिसर; स्टोन क्रशरविरोधात ग्रामस्थांचे भव्य जनआंदोलन
टाकवे बुद्रुक : मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक, बेलज, राजपुरी आणि परिसरात सुरू असलेल्या स्टोन क्रशर तसेच अवजड वाहनांच्या वाढत्या वाहतुकीविरोधात ग्रामस्थांनी सोमवारी (दि. २ जून २०२६) तीव्र जनआंदोलन छेडले. खंडोबा म्हाळसाकांत चौक, टाकवे बुद्रुक येथे सकाळी १० वाजता झालेल्या या आंदोलनात महिला, युवक, शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
परिसरात कथितरित्या अनधिकृतपणे सुरू असलेल्या स्टोन क्रशरमुळे मोठ्या प्रमाणात धूळ प्रदूषण होत असून नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. सतत उडणाऱ्या धुळीमुळे श्वसनाचे आजार वाढत असून शाळकरी मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
याशिवाय स्टोन क्रशरसाठी होणारी अवजड वाहनांची वाहतूक गावातील रस्त्यांवरून सुरू असल्याने अपघातांचा धोका वाढला असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. याबाबत प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांनी लोकशाही मार्गाने आंदोलनाचा पवित्रा घेतला.
“धुळमुक्त गाव, सुरक्षित भविष्य” हा संदेश देत ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने दखल घेण्याची मागणी केली. परिसरातील प्रदूषण त्वरित रोखावे, स्टोन क्रशर बंद करावेत आणि ग्रामस्थांच्या आरोग्य व सुरक्षिततेची हमी द्यावी, अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी प्रशासनाने तात्काळ कठोर कारवाई करून नागरिकांना न्याय द्यावा, अन्यथा पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही दिला.






