‘ग्रीन बर्थडे पार्क’ आणि ‘बर्थडे फॉरेस्ट’ उपक्रमातून पृथ्वीला द्या हिरवे गिफ्ट- अजित फाऊंडेशन हरित संकल्पना!
तळेगाव दाभाडे: वाढते प्रदूषण, दूषित हवा आणि वेगाने वाढणारे शहरीकरण यामुळे मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. श्वसनाचे आजार दिवसेंदिवस वाढत असताना, स्वच्छ हवेसाठी हिरवाईची गरज अधिकच तीव्र झाली आहे. या पार्श्वभूमीवर अजित फाउंडेशनचे अध्यक्ष महेश निंबाळकर यांनी एक नावीन्यपूर्ण आणि अर्थपूर्ण संकल्पना मांडली आहे – शहरांसाठी ‘ग्रीन बर्थडे पार्क’ आणि ग्रामीण भागासाठी ‘बर्थडे फॉरेस्ट’! या उपक्रमाद्वारे वाढदिवसाचा आनंद क्षणिक न राहता, पृथ्वीच्या आरोग्याशी जोडला जाणार आहे. “आनंद साजरा करा, पण पृथ्वीचे देणेही जपा,” हा या चळवळीचा मूळ गाभा आहे, असे अजित फाउंडेशनचे अध्यक्ष महेश निंबाळकर यांनी सांगितले.
—
*’बर्थडे फॉरेस्ट’ आणि ‘ग्रीन बर्थडे पार्क’ संकल्पना काय?*
प्रत्येकाने आपल्या वाढदिवसाला केक-कॅंडल्सऐवजी रोपे आणि पाणी घेऊन यावे. कुटुंब आणि मित्रांसह निश्चित केलेल्या वृक्षलागवड जागेत झाड लावावे. हाच तो खरा ‘हॅपी बर्थडे’ आणि ‘हॅपी अर्थडे’चा क्षण असेल!
वृक्षलागवड करताना ‘वृक्षसंवर्धनचा संकल्प करुन “झाडासह माझे आयुष्य वाढो, या पृथ्वीचा श्वास नव्याने फुलो!” ही सदिच्छा व्यक्त करावी. तसेच प्रत्येक झाडाजवळ व्यक्तीचे नाव, जन्मतारीख आणि QR कोड लावुन, ज्याद्वारे झाडाची वाढ डिजिटल पद्धतीने पाहण्याची सोय असावी.
—
*वृक्षपालकांची जबाबदारी*
वृक्षलागवड ही फक्त सुरुवात; खरे साजरेपण वृक्षसंवर्धनात आहे. प्रत्येक ‘वृक्षपालकाने’ आठवड्यातून एक तास श्रमदान करून झाडांना पाणी द्यावे, तण काढावे आणि आधार द्यावा. दर महिन्याला ‘हरित मेळावा’ आयोजित करून सहभागींनी अनुभव शेअर करावेत. नियमित काळजी घेणाऱ्यांना ‘ग्रीन पॉइंट्स’ आणि सन्मानपत्र देऊन गौरवावे.
—
*हरित उपक्रमासाठी निमित्त प्रसंग*
लग्न वाढदिवस: बंधन नव्हे, बंध जोडणे – झाडांसोबत जगणे!
मुलांचा जन्मदिवस: नवे आयुष्य, नवे रोप.
स्मृतीदिन: मनात आणि मातीत आठवण.
अशा प्रत्येक निमित्ताने झाड लावण्याची सवय रुजवल्यास समाजात ‘हरित संस्कृती’ निर्माण होईल. तसेच निवडणुकांमध्ये प्रभागातील उमेदवारांनी बाबर्थ डे पार्क साठी आग्रही राहावे व त्यासाठी तसा हरित अजेंडा जनतेपुढे मांडावा, तसेच प्रत्येक नागरिकांनी आपल्या वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून पृथ्वीला एक वृक्ष लागवड करुन पुढची पिढी श्वासासाठी झगडणार नाही, याची काळजी घ्यावी. याशिवाय वाढदिवसाचा व्यक्तिगत आनंद वैश्विक सुखाचे कारण बनेल, यासाठी आग्रही रहावे, स्थानिक प्रशासनाने पुढाकार घेऊन नागरिकांनी ‘हॅपी बर्थडे आणि हॅपी अर्थडे’ मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, अशी अपेक्षा अजित फाऊंडेशनचे अध्यक्ष महेश निंबाळकर यांनी व्यक्त केली.






