लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त तळेगावात ‘एकता दौड’ पोलिसांकडून एकात्मतेचा संदेश
तळेगाव दाभाडे :पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त शुक्रवार, दि. ३१ ऑक्टोबर रोजी “एकता दौड” या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमाचा उद्देश देशातील नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकता, सुसंवाद आणि देशभक्तीची भावना दृढ करणे हा आहे.
ही एकता दौड तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथून सकाळी ६.०० वाजता सुरू होणार असून, शहरातील विविध संस्था, शाळा-काॅलेजचे विद्यार्थी, नागरिक तसेच पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने यात सहभागी होणार आहेत. “एक भारत श्रेष्ठ भारत” या संकल्पनेला अधोरेखित करत पोलिस दलाकडून हा उपक्रम राबवला जात आहे.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, “आपण सर्वांनी या एकता दौडीत सहभागी होऊन सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वातंत्र्योत्तर भारताच्या एकीकरणासाठी दाखवलेल्या अद्वितीय कार्याला अभिवादन करावे. समाजातील प्रत्येक घटकाने या निमित्ताने एकतेचा आणि राष्ट्रभक्तीचा संदेश पुढे नेणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल.”
लोहपुरुष सरदार पटेल यांनी देशातील ५६२ संस्थानांना एकत्र आणून अखंड भारताची निर्मिती केली. त्यांचे दूरदर्शी नेतृत्व आणि अखंड भारतासाठीचे योगदान आजही प्रेरणादायी आहे. त्यामुळे त्यांच्या जयंतीनिमित्त देशभर “राष्ट्रीय एकता दिवस” साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनतर्फे आयोजित एकता दौड हा सामाजिक आणि राष्ट्रप्रेम जागवणारा उपक्रम ठरणार आहे.
या कार्यक्रमादरम्यान देशभक्तीपर घोषणांनी वातावरण भारलेले राहील. दौडीनंतर सहभागींसाठी अल्पोपहाराचे आयोजनही करण्यात आले आहे. स्थानिक नागरिक, सामाजिक संस्था, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच महिला बचत गटांनी उत्साहाने सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय एकतेचा संदेश पोहचविणाऱ्या या एकता दौडीमुळे तळेगाव परिसर देशभक्तीच्या रंगात रंगून जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
“एकतेतच आपली शक्ती सरदार पटेलांचे स्वप्न साकार करू या,” असा संदेश या उपक्रमातून देण्यात येणार आहे.
तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांचे आवाहन:
“३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे आयोजित ‘एकता दौड’मध्ये सहभागी व्हा आणि देशाच्या अखंडतेला सलाम करा.






