*मातृभाषेतील ज्ञाननिर्मिती ही शिक्षकांची जबाबदारी – डॉ. रंगनाथ पठारे*
तळेगाव दाभाडे (दि.५ सप्टेंबर):
आजचे आधुनिक ज्ञान, विज्ञान हे मातृभाषेत आणले पाहिजे. मातृभाषेत ज्ञानाची निर्मिती करणे ही शिक्षकांची जबाबदारी ठरते. आज इंग्रजी भाषेच्या अनैसर्गिक ओझ्याखाली समाज भरडून निघत असताना जे काही नवीन ज्ञान निर्माण होत आहे ते समजून घेण्यासाठी आपली मातृभाषाच हितकारक असल्याचे मत साहित्य अकादमी पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रंगनाथ पठारे यांनी व्यक्त केले. इंद्रायणी विद्या मंदिर संस्था आयोजित शिक्षक दिन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर सुप्रसिद्ध कवयित्री व शब्दालय प्रकाशनाच्या सुमती लांडे, इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे, खजिनदार शैलेश शहा, सदस्य गणेश खांडगे, निरुपा कानिटकर, संदीप काकडे, प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, प्राचार्य डॉ.संजय आरोटे, प्राचार्य गुलाब शिंदे, उपप्राचार्य प्रा.संदीप भोसले, गोरख काकडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य व नामांकित कवी डॉ. संभाजी मलघे यांच्या ‘अजूनी येतो वास फुलांना’ या ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांचे हस्ते पार पडले. तसेच वर्षभरामध्ये उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या शिक्षकांचा आदर्श शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट सेवक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना डॉ. पठारे म्हणाले की, हजारो वर्षाच्या ज्ञानाची परंपरा मातृभाषेतून मिळत असते. आज इंग्रजी भाषेचे वाढलेले अवास्तव महत्त्व हे मराठी भाषेची अपरिमित हानी करणारे आहे. यामुळे सामाजिक आणि शैक्षणिक पातळीवर गोंधळाची स्थिती निर्माण झालेली आहे. आपल्या भाषेला ज्ञानभाषा बनवायची असेल तर त्याचे सामूहिक उत्तरदायित्व शिक्षकांचे असल्याचे मत डॉ. पठारे यांनी व्यक्त केले. संत नामदेव महाराज ते तुकाराम महाराज या मधल्या मोठ्या कालखंडात मराठी भाषेत तयार झालेल्या अत्यंत चांगल्या कवितांमुळे छत्रपती शिवरायांसारखे युगपुरुष घडल्याचे दाखलेही यावेळी डॉ. पठारे यांनी दिले. याप्रसंगी व्यक्त केलेल्या विवेचनातून डॉ. रंगनाथ पठारे यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक पार्श्वभूमीचा धांडोळा घेत जातीय, धार्मिक, राजकीय सांस्कृतिक स्थित्यंतरांचा मोठा कालपट उपस्थित समोर उलगडून दाखविला.
आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या सदस्य निरुपा कानिटकर म्हणाल्या की, आज मातृभाषेची दयनीय अवस्था होण्यास आपणच कारणीभूत आहोत. जगाची ज्ञानभाषा होत असलेल्या इंग्रजीला महत्त्व देताना आपण आपल्या मातृभाषेला आणि त्यातील शब्दांना मात्र कमी लेखत आलो आहोत ही खूप मोठी चूक असल्याचे मत निरूप कानिटकर यांनी व्यक्त केले. यावेळी बोलताना त्यांनी व्यावसायिक कामानिमित्त परदेशामध्ये गेल्यानंतर मराठी भाषिक म्हणून मिळालेला सन्मान हा जगण्यातील अविस्मरणीय भाग असल्याचे सांगितले. उपस्थित महिला शिक्षक भगिनींच्या मोठ्या संख्येचे मान्यवरांनी केलेल्या कौतुकाचा धागा पकडत ‘स्त्रि’ ही जात्यातच शिक्षक असल्याची मिश्किल टिप्पणीही यावेळी कानिटकर यांनी केली.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी केले.
प्रास्ताविकात ते म्हणाले की ज्ञानाचा दिवा घरोघरी लावणाऱ्या शिक्षकांनी आपले सामाजिक भान आणि ज्ञान सदैव जागृत ठेवणे गरजेचे आहे. शिक्षक दिनाच्या माध्यमातून शिक्षकांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडणे गरजेचे आहे. इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेमार्फत होणाऱ्या शिक्षक दिनाची उत्तम परंपरा संस्थेने जपली असून विद्यार्थी व शिक्षक या दोहोंच्या विकासामध्ये संस्थेची भूमिका मोलाची असल्याचे मत यावेळी प्राचार्य मलघे यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री.रामदास काकडे कार्यवाह चंद्रकांत शेटे व खजिनदार शैलेश शहा यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या व पुरस्कार विजेत्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. सत्यजित खांडगे यांनी करून दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विणा भेगडे व प्रा. दीप्ती कन्हेरीकर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार बी फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय आरोटे यांनी मानले.