मसाप प्रकाशित करणार शहरातील वैभव स्थळांचा काव्यसंग्रह दहा एप्रिल पर्यंत काव्यरचना पाठवण्याचे मसापचे आवाहन

SHARE NOW

पिंपरी, पुणे (दि. २० मार्च २०२५) पाच गावांचे एकत्रीकरण करून पिंपरी चिंचवड नगर पालिकेची स्थापना करण्यात आली. गाव खेड्यांचे शहर, शहराचे महानगर, औद्योगिक नगरी, कामगार नगरी आणि आता आंतरराष्ट्रीय दर्जाचे मेट्रो शहर असा नावलौकिक या शहराला प्राप्त झाला आहे. पिंपरी चिंचवड शहराचे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्व वाढत असताना शहराच्या भौगोलिक कक्षा देखील वाढत गेल्या. यात पिंपरी चिंचवड शहराच्या नावलौकिकात भर घालणाऱ्या अनेक वैभव स्थळांचा समावेश आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने या विविध वैभव स्थळांचे वर्णन करणाऱ्या काव्यरचना एकत्र करून त्याचा काव्यसंग्रह प्रकाशित करण्याचा संकल्प केला आहे. यामध्ये शहरातील सर्वसामान्य नागरिकांपासून लेखक, कवी, रसिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पिंपरी चिंचवड शाखा अध्यक्ष राजन लाखे व हा नियोजित काव्यसंग्रह प्रकाशित करण्याची जबाबदारी घेतलेले समन्वयक संभाजी बारणे यांनी केले आहे. यासाठी दहा एप्रिल २०२५ पर्यंत आपल्या काव्यरचना महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा, द्वारा राजन लाखे, ३, लक्ष्मी कॉम्प्लेक्स, हनुमान स्वीट समोर, चिंचवड पुणे ३३ किंवा संभाजी बारणे (फोन – 9822314810) यांच्याकडे जमा कराव्यात. यासाठी निवड समितीने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे. कवीने स्वतःचे नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक हे शीर्षकाच्या वर उजव्या भागात लिहावे. कविता ३० ओळींपेक्षा मोठी नसावी. गझल, अभंग, गवळण, पोवाडा आदी. प्रकारच्या कवितांचा समावेश करण्यात येईल. कवितांमध्ये श्री महासाधू मोरया गोसावी, देऊळ मळा, मोरया गोसावी मंदिर, इंद्रायणी, पवना आणि मुळा नदी, राजा भोज ची भोजापुर नगरी, भोसरी गावचे कुस्ती क्षेत्रातील वैभव, क्रांतिवीर चाफेकर स्मारक, शहराची औद्योगिक नगरी म्हणून ओळख मिळवून देणारी एच. ए. कंपनी, हापकिन महामंडळ, टाटा मोटर्स, बजाज ऑटो कंपनी, सँडविक, एसकेएफ सारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्या, भक्ती शक्ती समूह शिल्प, शिवसृष्टी भोसरी, पिंपरी चिंचवड सायन्स पार्क, बर्ड व्हॅली उद्यान, विविध सांस्कृतिक महोत्सव, क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या विविध संस्थांची ओळख करून देणाऱ्या कविता, उद्योग नगरी ओळख, साहित्य नगरी ओळख, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, अप्पू घर, गुलाब पुष्प व फुलपाखरू, सर्प उद्यान, डायनासोर अशी आकर्षक उद्याने, शहरातील विविध मंदिरे, थोर महापुरुषांची स्मारके, मेट्रो, बोट क्लब थेरगाव, बहिणाबाई संग्रहालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, दुर्गा देवी टेकडी, गणेश तलाव, सांस्कृतिक केंद्रे, नाट्य केंद्रे, कुस्तीगीर, पिंपरी मार्केट, बास्केट ब्रिज या पिंपरी चिंचवडचे वैभव वाढवणाऱ्या विषयांवरती तसेच कवींना माहित असलेल्या इतर वैभव स्थळांची महती सांगणाऱ्या कविता १० एप्रिल पर्यंत जमा कराव्यात असे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सल्लागार सदस्य व या नियोजित काव्यसंग्रहाचे प्रकाशक संभाजी बारणे यांनी केले आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page