मनाच्या गाभाऱ्यात उमटलेले – कृतज्ञतेचे दोन शब्द…! डॉ. शाळीग्राम भंडारी (ज्येष्ठ लेखक, वक्ते, सामाजिक कार्यकर्ते )
तळेगाव दाभाडे :
होय मित्रांनो,
काळाच्या गरजेनुसार ज्येष्ठ नागरिकांसाठी एकत्र येण्यास हक्काचं असणाऱ्या ठिकाणाची निर्मिती भारतातील प्रत्येक गावांगावात सुरु झाली होती. त्याला तळेगाव दाभाडे अपवाद कसे ठरेल !
म्हणूनच ज्येष्ठ नागरिक मंडळाची स्थापना झाली ते साल होते ८ जानेवारी १९९४!
तळेगाव नगरपरिषदेने माननीय श्री यादवेंद्र खळदे व श्री. बापूसाहेब भेगडे यांच्या सहकार्याने मंडळाचे अध्यक्ष श्रीमान ए. आर. संदानशीव ह्यांचे अध्यक्षीय काळात, नगरपालिकेने आरक्षित केलेल्या सद्य स्थितीतील जागा मंडळास अधिकृतरित्या हस्तांतरीत केली ते वर्ष होते २००८-२००९!
तब्बल आठ वर्षानंतर म्हणजे २०१६-२०१७ ह्या वर्षी मंडळाचे अध्यक्ष श्री. ए. आर. संदानशीव ह्यांचेच कालावधीत ह्या आकर्षक, प्रसन्न, पवित्र वास्तुची निर्मिती झाली ते वर्ष होते जानेवारी २०१७! सन १९९४ ह्या वर्षीच्या मंडळाच्या स्थापनेपासून त्या त्या काळातील प्रत्येक अध्यक्षांनी आपल्या परीने यथाशक्ती मंडळाच्या यशस्वी वाटचालीसाठी आपले योगदान दिले. त्यासाठी मंडळाचे सर्व सन्माननीय सदस्य त्यांचे ऋणी आहोत.
मंडळाच्या अधिकृत जागेवरुन हायटेंशन लाईन गेल्यामुळे बांधकामास अनेक अडचणी होत्या. तथापि मंडळाचे सन्मानीय सभासद श्री. प्रदीपजी साठे व श्री. अनिल अंधारे (उपसंचालक, तंत्रशिक्षण महाराष्ट्र राज्य) या उभयतांच्या अनुभवसंपन्न, ज्ञानसंपन्नतेमुळे कुठलीही तांत्रिक अडचण न येता मंडळाची अतिशय आकर्षक वास्तू उभी राहिली.
यासाठी इंजिनिअर श्री. प्रदीपजी साठे, श्री. अनिल अंधारे आणि कुठल्याही नफ्याची यत्कींचितही अपेक्षा न करता बांधकाम व्यावसायिक श्री. ज्ञानेश्वर बवले या सर्वांचे आम्ही मंडळाचे सर्व सन्माननीय सभासद आभारी आहोत !
सन २०१७ पासून २०२५ पर्यंतच्या कालावधीत असणारे मंडळाचे अध्यक्ष श्री. विठ्ठलराव कांबळे, श्री. सुधाकर रेंभोटकर आणि श्री. अशोकजी काळोखे ह्यांनी यथाशक्ती सभागृहाच्या नित्य गरजा असणाऱ्या इमारती – त्यात उत्तम अन्नपूर्णा स्वयंपाकगृह, सर्व सोयींनी युक्त स्वच्छतागृह, मंडळाची वाढती सभासद संख्या लक्षात घेऊन जवळजवळ अडीच हजार स्क्वेअर फुटाच्या अतिशय देखण्या, आकर्षक, विस्तारीत सभागृहाची निर्मिती केली! त्याबद्दल मंडळाच्या सन्माननीय सभासदांचे मनात त्यांच्याविषयी असणारी कृतज्ञतेची ज्योत त्यांच्या अंत:करणात सदैव तेवत राहील !
देणगीदारांविषयी कृतज्ञतेचे दोन शब्द…
मित्रांनो,
आपण सर्व स्वप्न बघतो, ते साकार करण्यासाठी प्रचंड प्रयत्नही करतो, आपल्याला त्यात यशही मिळतं ! सर्व सोंगं आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही त्यामुळेच आर्थिक अडचणींचा डोंगर उभा राहतो, तो डोंगर पार करण्यासाठी सर्वच पातळीवर आपल्याला प्रयत्न करावे लागतात.
ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळाच्या हक्काच्या जागेत स्वतःची वास्तू उभी करण्याचा प्रस्ताव पदाधिकाऱ्यांच्या समोर आला, पण त्यासाठी लागणारं आर्थिक पाठबळ आवश्यक होतं !
मंडळाची ही आर्थिक अडचण लक्षात घेऊन मंडळाचे निष्ठावंत सभासद श्रीमान दशरथ बवले आणि गेली पन्नास वर्ष मावळात वैद्यकीय सेवा करणारे डॉ. शाळीग्राम भंडारी ह्या उभयतांनी मंडळाच्या सन२०१६-२०१७ च्या कार्यकारणीच्या संमतीने, इंजिनिअर प्रदीपजी साठे ह्यांनी काढलेल्या सभागृहाच्या आराखड्यानुसार जवळ जवळ १५ लाखाचा निधी गोळा करुन ह्या सभागृहाची निर्मिती केली.
डॉ. शाळीग्राम भंडारींनी जनतेला केलेल्या आवाहनाला प्रथम स्वतः डॉ. भंडारी, आणि मंडळाचे ज्येष्ठ सभासद दशरथजी बवले या उभयतांनी ही इमारत उभारण्यास सिंहाचा वाटा उचलला. त्याबरोबरच अनेक दानशूर व्यक्तिंनी त्यांच्या आवाहनास भरघोस प्रतिसाद दिला ! त्यात प्रसिध्द उद्योगपती श्री. सुमतीलाल शहा, श्री. किरण रगडे, श्री. ब्रिजेंद्र किल्लावाला ह्या उभयतांनी आवश्यक असलेले आर्थिक सहाय्य केले म्हणून ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळ ह्या सर्व देणगीदारांचे ऋणी आहेत !
सभागृह विस्तारीकरण – सुशोभीकरण …..
तळेगाव दाभाडे शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या अनेक सार्वजनिक संस्थांच्या इमारतींची निर्मिती झाली. ह्या बदलत्या काळातील ही विचारधारा लक्षात घेऊनच संस्थेच्या त्या त्या काळातील संस्थेचे अध्यक्ष व कार्यकारणीने तळेगाव परिसरातील देणगीदाराना मंडळाच्या आर्थिक मदतीसाठी परत मनःपूर्वक विनंती केली. ह्या मंडळाच्या निःस्वार्थ, निष्काम, कर्मयोगी असणाऱ्या मंडळाच्या कळकळीच्या विनंतीला आर्थिक सहाय्य करुन तळेगावातील दानशूर व्यक्तींनी आपला सक्रीय सहभाग नोंदविला !
त्यात विशेष उल्लेख करावा लागेल तो म्हणजे १) विद्यमान कृतीशील आमदार सुनिलआण्णा शेळके २) प्रसिध्द उद्योगपती श्री. सुमतीलाल शहा (चांदखेड, ता. मावळ, जि. पुणे) ३) शैक्षणिक क्षेत्रात विशेष योगदान असलेले माजी प्रांतपाल ला. डॉ. दीपकभाई शहा ४) प्रसिध्द उद्योगपती व सामाजिक कार्यकर्ते श्री. अशोकजी काळोखे ह्यांचे बरोबरच यथाशक्ती आर्थिक सहाय्य करणाऱ्या दानशूर व्यक्ती सहाय्यभूतठरलेल्या आहेत.
ह्या सर्वांसाठी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करण्यास मंडळाच्या सर्व सन्माननीय सभासदांच्या शब्द कोषात शब्द नाहीत ! म्हणून मंडळ सदैव त्यांचे ऋणातच राहील.
रौप्य महोत्सवाकडून सुवर्ण महोत्सवाकडे अत्यंत दैदीप्यमान घोडदौड करणाऱ्या या ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळाचा भक्कम पाया ज्यांनी घातला ते निष्काम कर्मयोगी होते- डॉक्टर शांतीलाल जैन श्री. यशोधर धारणे श्री. कृष्णकांत महाजन श्री. दत्तात्रय फडके आणि दामोदर बर्वे आणि ती तारीख होती ८ जानेवारी १९९४ ! या सर्व महानुभावांविषयी कृतज्ञतेचे भाव व्यक्त केल्याशिवाय हा आमच्या ऋणानुबंधाचा आविष्कार पूर्णत्वास जाऊ शकत नाही म्हणून त्यांचे मनःपूर्वक आभार !
आज मितीला ज्येष्ठ नागरिक मंडळ (तळेगाव दाभाडे) आपल्या अत्यंत प्रसन्न, पवित्र, आकर्षक अशा स्वतःच्या वास्तूमुळे केवळ मावळातच नव्हे तर पुणे जिल्ह्यात अग्रगण्य आहे, हे केवळ मंडळाच्या त्या त्या काळातील कार्यकारणीसह अध्यक्षांनी दिलेल्या निःस्वार्थ योगदानामुळे आणि देणगीदारांच्या उदार अर्थसहाय्यामुळेच हे शक्य झाले. म्हणूनच त्यांच्या विषयी मनाच्या गाभाऱ्यातून उमटलेले कृतज्ञतेचे दोन शब्द….!