लोणावळ्यात डॉक्टर दांपत्याचे हातपाय बांधून शस्त्राचा धाक दाखवत दरोडा
लोणावळा:
लोणावळा शहरात सोमवार दिनांक २६मे २०२५ रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास लोणावळा शहरातील प्रसिद्ध डॉक्टर हिरालाल खंडेलवाल यांच्या घरावर दरोडा पडला. दरोडेखोरांनी डॉ खंडेलवाल आणि त्यांच्या पत्नी विजया खंडेलवाल यांचे हातपाय बांधून त्यांच्या तोंडात कापड कोंबून त्यांना शस्त्राचा धाक दाखवत घरातून सोन्या चांदीचे डायमंडचे दागिने. रोख रक्कम असा एकूण ११लाख ५० हजाराचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी तरुण चंद्रमोहन खंडेलवाल(वय५८. लोणावळा) यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून फिर्यादी तरुण खंडेलवाल यांचे चुलते डॉ हिरालाल खंडेलवाल यांच्या खंडेगेवाडी लोणावळा येथे ओम श्री बंगला आहे. त्यांच्या बंगल्यात सुरक्षारक्षक अंबादास रायबोने व वर्षा रायबोने हे बंगल्याच्या पोर्च मध्ये झोपले होते. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास २२ दरोडेखोरांनी शस्त्रासह बंगल्यात येऊन सुरुवातीला रायबोने दांपत्याचे कपड्याने हातपाय बांधले आणि तोंडात कापड कोंबले त्यानंतर डॉ हिरालाल खंडेलवाल आणि त्यांच्या पत्नी विजया खंडेलवाल झोपलेल्या बेडरूमचा दरवाजा दरोडेखोरांनी तोडला. खंडेलवाल पती-पत्नीचे दरोडेखोरांनी हातपाय बांधून त्यांच्या तोंडात कापड कोंबून शस्त्राचा धाक दाखवत घरातून ११लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे डायमंड चे दागिने. रोख रक्कम चोरून नेली. लोणावळा शहरामध्ये मागील अनेक वर्ष वैद्यकीय सेवा देणारे डॉ हिरालाल खंडेलवाल यांच्या घरावर आतापर्यंत दोन वेळा सशस्त्र दरोडा पडला असून दोन वेळा दरोड्याचा प्रयत्न झाला आहे. या दरोड्याने शहरात खळबळ उडाली असून पोलिसांच्या डोळ्यासमोर दरोडेखोर पळाले. त्यामुळे पोलिसांची प्रतिमा मलीन करणाऱ्या त्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाला तत्काळ निलंबित करा अशी मागणी लोणावळ्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी केली आहे.