कुदळवाडीतील धार्मिक स्थळांची पुनर्बांधणी करा; आरपीआयचे अजिज शेख यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी
पिंपरी(प्रतिनिध) दिनांक १२ मे २०२६: पिंपरी-चिंचवड महापालिकेने कुदळवाडी परिसरात मंदिर आणि मशिदीवर अचानक केलेल्या कारवाईमुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता आणि धार्मिक भावनांचा विचार न करता करण्यात आलेल्या या कारवाईचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (वाहतूक आघाडी) चे राज्याध्यक्ष अजीज भाई शेख यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. धार्मिक स्थळांची पुनर्बांधणी करावी अशी मागणी त्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ विजयकुमार सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे. पिंपरी येथे (दि.१२)पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सम्राट जकाते, पिंपरी चिंचवड शहर सरचिटणीस बाबा सरोदे,गजानन घुगे आदी उपस्थित होते.
अजीज भाई शेख यांनी सांगितले की, प्रशासनाने अतिशय संवेदनशील जागेवर बूट-चपला घालून प्रवेश केला, ज्यामुळे पावित्र्य भंग पावले आहे. शुक्रवारी मुस्लिम समाज नमाजसाठी मशिदीत जातो तसेच शनिवारी हनुमान मंदिरात प्रार्थना होते. अशा पवित्र दिवशी कारवाई करून दोन समाजांत असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.जर ही धार्मिक स्थळे विकासकामात किंवा रस्त्याच्या मध्ये येत असतील, तर प्रशासनाने आम्हाला विश्वासात घेऊन पूर्वकल्पना द्यायला हवी होती.स्वतःहून प्रशासनाला सहकार्य करून जागा ॲडजस्ट करून दिली असती. मात्र, कोणाच्या तरी राजकीय दबावाखाली येऊन अशा प्रकारे अचानक पाडकाम करणे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही असे शेख म्हणाले.
पाडलेली धार्मिक स्थळे महापालिकेने स्वखर्चाने पुन्हा बांधून द्यावीत.धार्मिक स्थळांच्या विटंबनेस कारणीभूत असलेल्या अधिकाऱ्यांची आणि दबाब टाकणाऱ्यांची चौकशी व्हावी. कुदळवाडीतील कारवाईत अनेक वर्षांपासून व्यवसाय करणारे गोरगरीब लोक बेरोजगार झाले आहेत, त्यांना पुन्हा रोजगाराची संधी द्यावी. बांगलादेशी रोहिंग्या मुसलमानाच्या नावाखाली कुदळवाडी मध्ये काही दिवसापूर्वी कारवाई करण्यात आली परंतु प्रत्यक्ष तेथे कोणताही बांगलादेशी व्यक्ती सापडलेला नाही. विकास आराखड्यावर जवळपास ५० हजाराच्या वरती हरकती आहेत त्यांचा निकाल आयुक्तांनी लवकर लावला पाहिजे.संविधानाचा आधार घेऊन आम्ही या अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरू. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही गणपती बाप्पांची आरती आणि मशिदीत नमाज पठण करून शांततामय मार्गाने पण ठामपणे आपला विरोध नोंदवू. आमदार महेश दादा लांडगे यांना निवेदन देऊन पुन्हा मंदिर मज्जित बांधण्यासाठी आग्रह करणार आहोत.






