किवळे–रावेत परिसर धुळीच्या विळख्यात; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त

SHARE NOW

रावेत: किवळे – रावेत परिसरात सुरू असलेली मोठ्या प्रमाणावरील रस्त्यांची कामे, ड्रेनेज लाइनचे खोदकाम आणि उभारले जात असलेले बांधकाम प्रकल्प यामुळे संपूर्ण परिसर धुळीने व्यापला असून नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. दिवसभर उडणाऱ्या धुळीमुळे आरोग्याच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

 

या भागात माती, वाळू, डस्ट आणि सिमेंट वाहतूक करणाऱ्या डंपर–ट्रकची सततची वर्दळ, तसेच या वाहनांतून रस्त्यावर सांडणारा डस्ट आणि माती यामुळे प्रदूषणाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी डोळ्यांची जळजळ, धुळीची अ‍ॅलर्जी, श्वसनाचे त्रास अशा समस्या सर्व वयोगटातील नागरिकांना भेडसावत आहेत.

 

नागरिकांनी या संदर्भात महापालिकेकडे वारंवार तक्रारी केल्या असूनही प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक रहिवासी करत आहेत.

 

*या मार्गांवर पाण्याची फवारणी अनिवार्य’*

Advertisement

 

रावेत–किवळे परिसरातील मुकाई चौक, चंद्रभागा कॉर्नर, एस. बी. पाटील स्कूल परिसर, तसेच किवळे–समीर लॉन्स मार्ग याठिकाणी सकाळ–संध्याकाळ नियमित पाण्याची फवारणी करण्याची तातडीची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

 

या भागात अनेक विकासकामांचा वेग वाढल्याने आगामी काळात धुळीचे प्रमाण आणखी भयावह होऊ शकते. कामे पूर्ण होईपर्यंत नियमित पाण्याची फवारणी करणाऱ्या गाड्यांची व्यवस्था महापालिकेने करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

 

*महानगरपालिकेला लेखी निवेदन*

 

रावेत–किवळे परिसरात वेगाने वाढणारी नागरी वस्ती आणि वाढते प्रदूषण पाहता नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बाप्पू कातळे यांनी महापालिकेला दिलेल्या लेखी निवेदनात केली आहे.

 

निवेदनात प्रशासनाने त्वरित हालचाल करून पाण्याच्या फवारणीची व्यवस्था करावी, संबंधित कामांवर नियंत्रण वाढवावे आणि धुळीपासून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी ठाम भूमिका व्यक्त करण्यात आली आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page