देहूतील परंडवाल चौकातील सिग्नल दोन वर्षांपासून बंद; वाहनचालक व नागरिकांकडून तातडीने पुन्हा सुरू करण्याची मागणी

SHARE NOW

देहूगाव: देहुगाव येथील परंडवाल चौकात नगरपंचायत प्रशासनाने बसवलेले वाहतूक नियंत्रक दिवे (सिग्नल) गेल्या दोन वर्षांपासून बंदच असून अद्यापही कार्यान्वित झालेले नाहीत. त्यामुळे या महत्त्वाच्या चौकात दररोज तीव्र वाहतूक कोंडी निर्माण होत असून, नागरिक आणि वाहनचालकांनी सिग्नल तातडीने सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

 

देहू–देहूरोड हा अरुंद पालखीमार्ग असून या मार्गावर हलकी व अवजड अशा दोन्ही प्रकारच्या वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. येलवाडी, विठ्ठलनगर, काळोखे चौक ते परंडवाल चौक, तसेच देहू–देहूरोड या दोन्ही दिशांमधून येणारी वाहने एकाच वेळी परंडवाल चौकात एकत्र येतात.

Advertisement

 

विशेषतः सकाळी ७:३० ते ११:०० आणि सायंकाळी ५:३० ते रात्री ८:३० या गर्दीच्या वेळेत चौकात प्रचंड वाहतूक कोंडी होते. या कोंडीवर नियंत्रण ठेवताना वाहतूक पोलिसांची अक्षरशः दमछाक होते, तर काहीवेळा सामाजिक कार्यकर्त्यांनाही मदतीसाठी पुढे यावे लागते.

 

सततच्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त झाले असून, कामकाजात उशीर, पर्यावरणीय प्रदूषण आणि अपघाताचा धोका देखील वाढला आहे. अशा परिस्थितीत बंद पडलेले सिग्नल त्वरित कार्यान्वित करावेत, अशी ठाम मागणी स्थानिक नागरिक आणि नियमित प्रवास करणारे वाहनचालक प्रशासनाकडे करत आहेत.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page