# कामशेत ग्रामस्थांनी केलेल्या कुंभकर्ण जागो आंदोलनाला यश.३० टक्के करवाढ अखेर रद्द#
कामशेत : कामशेत ग्रामपंचायतने एकतर्फी पणे केलेली ३० टक्के घरपट्टी वाढ अखेर मागे घेण्यात आली आहे. कामशेत ग्रामस्थांनी या ३० टक्के घरपट्टी विरोधात सोमवार दिनांक ५मे २०२५ रोजी वडगाव पंचायत समोर कुंभकर्ण जागो आंदोलन केले होते या आंदोलनाला यश आले असून ३० टक्के करवाढ रद्द करण्यात आली आहे.३० टक्के करवाढ रद्द करावी यासाठी कामशेत ग्रामस्थांनी वेळोवेळी प्रशासनाला लेखी पत्र व्यवहार केला होता तसेच वडगाव पंचायत समोर सर्व ग्रामस्थांनी कुंभकर्ण जागो आंदोलन देखील केले होते. कामशेत ग्रामपंचायत ने कोणतीही पूर्व सूचना न देता व नागरिकांना विश्वासात न घेता ३० टक्के कर वाढ लागू केली होती. कामशेत ग्रामपंचायतचे तत्कालीन ग्रामसेवक राजकुमार सोनटक्के यांनी मिळकतीचे कोणतेही फेर सर्वेक्षण न करता ही करवाढ जाहीर केली होती. या अचानक वाढीव कराच्या विरोधात ग्रामस्थांनी ग्रामसभेत ठराव केला होता तरीही कामशेत ग्रामपंचायतने नागरिकांना नोटिसा बजावून वाढीव कर भरण्यास भाग पाडले. त्यामुळे कामशेत ग्रामस्थांनी कुंभकर्ण जागो हे अनोखे आंदोलन केले होते. या आंदोलनाला अखेर यश आले असून मावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान यांनी ३० टक्के वाढीव करास स्थगिती दिली आहे. ज्यांनी कर भरला आहे त्यांच्या पुढील करातून ही रक्कम समायोजित करण्यात येणार आहे. कामशेत ग्रामपंचायतला दिलेल्या आदेशात म्हटले आहे की विशेष ग्रामसभेच्या ठरावाच्या आधारे नवीन कार्यवाही करण्यात यावी. नियमानुसार फेर सर्वेक्षण. समिती गठीत करणे आणि अंतिम कर आकारणी यादी ग्रामसभेच्या मान्यतेनेच प्रसिद्ध करण्यात यावी.अशा स्पष्ट सूचना ग्रामपंचायतला देण्यात आल्या आहेत. कामशेत ग्रामस्थांनी जी एकजूट दाखवली त्यामुळे ही ३० टक्के करवाढ रद्द करण्यात आली आहे असे या आंदोलनाचे नेतृत्व करणारे माजी सरपंच अभिमन्यू प्रकाश शिंदे यांनी म्हटले आहे.