*जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला लोणावळ्यातील विविध विकासकामांचा आढावा, रेल्वे उड्डाणपुलाच्या कामास होणार सोमवारपासून सुरूवात*

SHARE NOW

लोणावळा, ५ जून – लोणावळा शहरात विविध विकासकामांचा पाहणी दौरा व आढावा बैठक आज (गुरुवारी) पार पडली. आमदार सुनील शेळके, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या उपस्थितीत या बैठकीत शहरातील प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या दौऱ्यात गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या भांगरवाडी ते नांगरगाव दरम्यानच्या रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या संदर्भात जिल्हाधिकारी डुडी यांनी संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांना आदेश देत येत्या सोमवारपासून हे काम तातडीने सुरू करण्याच्या सूचना दिल्या.

बैठकीत पुढील महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली:

 

* *लोणावळा भाजी मंडईची दुरुस्ती व व्यवस्थापन*,

* *खंडाळा माध्यमिक शाळेच्या जागेचा वापर*

Advertisement

* *रिक्षा व टॅक्सी संघटनांच्या मागण्या*

* *शहरात नवीन पर्यटन केंद्र विकसित करण्याची गरज*,

* *वाहतूक कोंडीवर उपाययोजना व पर्यटकांची सुरक्षितता*.

 

त्यानंतर टायगर पॉइंट आणि लायन्स पॉइंट परिसरास भेट देऊन प्रस्तावित ‘ग्लास स्काय वॉक’ प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डुडी यांनी, सर्व विकासकामे गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे, अशी स्पष्ट सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिली.

या दौऱ्यात लोणावळा शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी, रिक्षा व टॅक्सी संघटना, भाजी मंडई व्यापारी, पथविक्रेते, टपरी संघटना यांचे पदाधिकारी, तसेच उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC), पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA), भूमि अभिलेख, विद्युत व परिवहन विभाग यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ही बैठक लोणावळा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरली.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page