चाकण येथे नाईट शिफ्टला निघालेल्या 27 वर्षीय तरुणीवर अत्याचार, अंधारात फरफटत नेऊन दुष्कर्म

SHARE NOW

चाकण :

खेड तालुक्यातील मेदनकरवाडी परिसरात रात्रपाळीसाठी कामावर निघालेल्या एका 27 वर्षीय महिलेवर अज्ञात इसमाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घडलेला प्रकार कुणाला सांगितला, तर जीवे ठार मारण्याची धमकी आरोपीने पीडितेला दिली. या प्रकरणात पोलिसांनी अवघ्या काही तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

कंपनीत कामावर निघालेल्या महिलेवर अंधाराचा फायदा घेऊन, रस्त्यावरून फरफटत निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना मंगळवारी रात्री साडेदहा वाजता चाकण येथील मेदनकरवाडी येथे घडली. पीडित महिला नाइट शिफ्टसाठी कंपनीत जात होती. अज्ञाताने तिचा पाठलाग करून खंडोबा मंदिराजवळ तिचा रस्ता अडवला. त्यानंतर जबरदस्तीने ओढत निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर आरोपीने पळ काढला. प्रकाश तुकाराम भांगरे (रा. मेदनकरवाडी, मूळ रा. अकोले, जि. अहमदनगर) असे आरोपीचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत 13 मे रोजी रात्री 11:15 ते 11:45 वाजताच्या सुमारास, खेड तालुक्यातील मेदनकरवाडी, मुटकेवाडी येथील भुरुक कॉम्प्लेक्सच्या मागे एक 27 वर्षीय महिला रात्रपाळीतील कामासाठी कंपनीत जात होती. यावेळी आरोपीने तिला जबरदस्तीने शाळेच्या मागील बाजूस ओढून नेले. तिथे तिच्यावर बलात्कार करून मारहाण केली आणि कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

Advertisement

घटनास्थळी कोणीही दिसत नसल्याने महिला घाबरली होती. तिने आरडाओरडा करण्याचा प्रयत्नही केला; तसेच आरोपीपासून सुटका करून घेण्यासाठी तिने आरोपीचा चावाही घेतला. एक कामगार महिला आणि पुरुष तेथून जात होते. त्यांच्या मदतीने शंभर नंबरवर फोन करून पीडित महिलेने पोलिसांना बोलावून घेतले. महिलेला तातडीने ‘वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या घटनेची माहिती मिळताच चाकण पोलिसांनी तातडीने कारवाईला सुरुवात केली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन, पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या सहकार्याने सहा विशेष पथके स्थापन करण्यात आली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण केले आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपास पुढे नेला. या तपासादरम्यान आरोपी भांगरे असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कौशल्यपूर्ण चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

पीडितेवर अत्याचार होत असताना काही अंतरावर एक व्यक्ती शतपावली करीत होती. पीडितेने त्याला बघून आरडाओरडा केला. मात्र, पीडितेचा आवाज त्याच्यापर्यंत पोहोचला नाही. त्यामुळे तिला मदत मिळाली नाही.

दरम्यान, चाकण पोलिसांनी विविध कलमाच्या अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे स्थानिकांमध्ये काहीसा दिलासा निर्माण झाला असला, तरी अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजनांची गरज व्यक्त होत आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page