कलापिनी स्वास्थ्ययोगाचा २१ वा वर्धापन दिन व जागतिक हास्यदिन उत्साहात साजरा….
तळेगाव दाभाडे :
हसता हसता कार्य विधायक,,
होईल आपुले जीवन सार्थक.
हसू हसवू सुखी निरंतर,
बनवू आपुले जग हे सुंदर !!
जीवनात सकारात्मकता वाढविते ते हास्य ! नैराश्य दूर करते ते हास्य ! रोगप्रतिकारक शक्ती वाढवून व्याधींपासून मुक्तता करणारे हे हास्य ! तळेगावात गेल्या २१ वर्षे अनेक ज्येष्ठांनी हे अनुभवले आहे.कलापिनी हास्य संघासह यशवंतनगर हास्यसंघ, वतननगर हास्यसंघ,सासर माहेर हास्यसंघ, वानप्रस्थाश्रम व पंचवटी काॅलनीतील नानानानी पार्क हास्यसंघ तळेगावात कार्यरत आहेत. या सर्व हास्य संघांनी एकत्र येऊन कलापिनीमध्ये जागतिक हास्यदिन व केंद्र शाखेचा २१ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा केला.
मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलन करुन नटराज पूजनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. रेखा रेंभोटकर व दिप्ती आठवले यांनी सुमधुर गणेश स्तवन सादर केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधवी मराठे व दिप्ती आठवले यांनी केले. संपदा नातू यांनी वर्षभराचा अहवाल सादर केला.
या निमित्ताने बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम ‘रखुमाई रुसली ‘ गीत गायन नंदिनी टाले, महादेवी ढब्बू व रेखा रेंभोटकर यांनी तर ‘ हास्य देव आला’ हे गीत रेखा व दिप्ती यांनी गायले. दोन्ही नृत्ये कलापिनी स्वास्थ्ययोगाच्या हास्ययोगींनी सादर केली.
मिसळपाव ही कविता व मोबाईल चे दुष्परिणाम ही नाटिका यशवंतनगर हास्यसंघाच्या विद्या मुळे व जयश्री जोशी आणि सहकारी यांनी सादर केली. तसेच भक्तिगीत व लोकगीत जुगलबंदी
नाना नानी पार्क हास्यसंघाच्या आशा जैन, सुशिला गायकवाड आणि सहकारी यांनी सादर करुन वाहवा मिळविली.
या निमित्ताने जेष्ठ हास्य दूत मधुकर बासरकर(अप्पा), संस्थापक, यशवंतनगर हास्यसंघ यांचा यथोचित सत्कार कलापिनी विश्वस्त डॉ. अनंत परांजपे यांचे हस्ते करण्यात आला. अप्पां हे शेजार ज्येष्ठ नागरिक संघ व इतर अनेक सामाजिक संस्थांमध्ये कार्यरत असतात. त्यांच्या सहचारिणी सौ.उर्मिला बासरकर यांचा सत्कार करण्यात आला.आणखी एक हास्य योगी, कॅरमपटू व नवोदित लेखक अनंत देशपांडे यांचा त्यांच्या लेखन कौशल्यासाठी मानपत्र देऊन कार्यक्रम अध्यक्ष डॉ. शाळीग्राम भंडारी यांचे हस्ते सन्मान करण्यात आला.१५० हून अधिक व्यक्तीविषेश लेख तर ३००हून अधिक विविध विषयांवरील लेख असे शैलीदार उत्तम लेखन त्यांनी केले.त्यांच्यासह सौ.अनिता देशपांडे यांचाही सन्मान केला.
स्वास्थ्ययोग प्रमुख अशोक बकरे यांनाही वाढदिवसानिमित्त श्री व सौ.सुनिता बकरे यांना औक्षण करुन शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.शाळीग्राम भंडारी, डॉ. अनंत परांजपे, विश्वस्त कलपिनी, कार्याध्यक्षा अंजली सहस्रबुद्धे, खजिनदार श्रीशैल गद्रे, सत्कारार्थी मधुकर बासरकर व अनंत देशपांडे , विश्वास देशपांडे व समर्थ भक्त मोरेश्वर होनप यांची विशेष उपस्थिती होती.
डॉ. भंडारी यांनी २१ वर्षं सातत्याने चालू असलेल्या या उपक्रमाचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या.
शेवटी प्रार्थना व अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सर्वच हास्ययोगींनी सहकार्य केले.